आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरवी मिरची झाली खिशाला तिखट !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर प्रचंड कडाडले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी 50 रुपयांना मिळणार्‍या हिरव्या मिरचीचे दर वाढून आता 60 ते 80 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. हिरव्या मिरचीचे भाव वाढल्यामुळे नगरकरांचा खिसाही तिखट झाला आहे. पालकाची जुडी 12 रुपयांना झाली आहे. वांगी, भेंडी, गवार 60 रुपये किलोप्रमाणे विकली जात आहे. नेहमी डोळ्यांना पाणी आणणारा कांदा मात्र सध्या 18 रुपये किलो आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दुष्काळामुळे भाजीपाल्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पिण्यासाठी पाणी मिळण्याची मानामार असल्याने माळवे पिकवण्यासाठी शेतकर्‍यांना पाणी मिळणे प्रचंड जिकिरीचे होऊन बसले आहे. जिल्हा प्रशासनाने शेतीसाठी धरणांचे पाणी देण्याचे बंद केल्यामुळे हताश होण्याची पाळी शेतकर्‍यांवर आली आहे. पाण्याअभावी शेतकर्‍यांनी माळवे काढणेच बंद केले आहे.

माळवे निघणे बंद झाल्यामुळे बाजारातून शेपू आणि आंबटचुका यंदा गायब झाला आहे. गेल्या महिन्यात बाजार समितीत दररोज पाच हजारांहून अधिक मेथीच्या जुड्यांची आवक होत होती. आता ही आवक प्रचंड घटली असून दररोज केवळ तीनशे ते सातशे मेथीच्या जुड्या विक्रीसाठी येत आहेत. साहजिकच पालेभाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. नगर तालुक्यात पालेभाज्या शिल्लक नसल्यामुळे तालुक्याबाहेरुन भाज्यांची आवक होत आहे.

बाजारातील वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नगरकरांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ बसत आहे. पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. समाधानाची बाब म्हणजे या महागाईत कांद्याने मात्र सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. नेहमी रडवणारा कांदा सध्या 15 ते 20 रुपये किलो दराने मिळतो आहे. बटाटादेखील अजून स्वस्त आहे.

कांद्याने दिला दिलासा
मागील महिन्यात दररोज सातशे ते एक हजार क्विंटल कांदा बाजारात येत होता. त्याचा दर 10 ते 12 रुपये किलो होता. या महिन्यात मात्र चांगल्या कांद्याची आवक काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे चांगल्या कांद्याचा दर किलोमागे 18 ते 20 रुपये झाला आहे.


तर मेथी, पालक गायब होईल
शेतकर्‍यांनी सध्या भाजीपाला काढणे बंद केले आहे. 15 जूनपर्यंत मेथी व पालक उपलब्ध होईल. त्यानंतर बाजारातून या दोन्ही भाज्या गायब होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर पालेभाज्यांची नासाडी होते. त्यामुळे पालेभाज्यांची बाहेरुन आवक करावी लागेल. त्यांचे दर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणतील. कांद्याचे दर सध्या स्थिर असले, तरी पावसानंतर तेदेखील वाढण्याची शक्यता आहे.’’ मनीषा बाळासाहेब तरोटे, भाजीविक्रेत्या.


महिन्याचे बजेट कोलमडले
बाजारात सध्या हायब्रीड मिरची आली आहे. ही मिरची दिसायला हिरवीगार असली, तरी तिला तिखट चव अजिबात नाही. मिरचीचा भरपूर वापर करुनही भाजी तिखट होत नसल्यामुळे चवीसाठी नाईलाजाने आयता मसाला वापरावा लागत आहे. पालेभाज्यांचे भाव वाढल्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.’’ अपर्णा राजोपाध्ये, गृहिणी.


भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)
प्रकार पूर्वीचे दर आताचे दर
मेथी 12 (जुडी) 20 (जुडी)
पालक 8 (जुडी) 12 (जुडी)
कोथिंबीर 15 (जुडी) 30 (जुडी)
शेपू 12 (जुडी) 16 (जुडी)
वांगी 30 50
भेंडी 40 50
हिरवी मिरची 45 60-80
गवार 40 60
कोबी 15 25
टोमॅटो 25 35-40
शेवगा 25 40
मुळा 8 12
फ्लॉवर 50 60
सिमला मिरची 25 40
कांदा 12 18
बटाटा 15 20