आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vallabhbhai Patel Birth Anniversary News In Marathi

सरदार पटेलांच्या आठवणी जपणारी खोली सुनी सुनी, वल्लभभाई पटेल यांची उद्या जयंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- चले जाव आंदोलनात भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना नगरच्या किल्ल्यातील ज्या खोलीत स्थानबद्ध करण्यात आले होते, तेथे त्यांची छोटीशी तसबीर आणि तुटपुंज्या माहिती व्यतिरिक्त काहीही नाही. नाही म्हणायला या रिकाम्या खोलीत कधीतरी कबुतरांचे गुटर्रगू ऐकू येते. एकीकडे गुजरातमध्ये 2,989 कोटी रुपये खर्च करून 182 मीटर उंचीचा सरदार पटेलांचा महाकाय पुतळा (स्टॅच्यू आॅफ युनिटी) उभारण्याची धामधूम सुरू असताना नगरच्या किल्ल्यातील नेत्यांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी मात्र अजून दुर्लक्षितच राहिली आहे.
ऑगस्ट 1942 ते एप्रिल 1945 या काळात सरदार पटेल नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात स्थानबद्ध होते. त्यांच्यासमवेत पंडित नेहरू, मौलाना आझाद व अन्य आठ नेते होते. वृद्धापकाळ आणि पोटाचा वाढलेला आजार यामुळे त्रस्त असतानाही सरदार पटेल यांनी नगरच्या वास्तव्यात केवळ देशाच्या स्वातंत्र्याचाच ध्यास घेतला होता. नेहरू व पटेल यांच्यात अनेक बाबतीत तात्त्विक वाद होते. नगरच्या किल्ल्यातील वास्तव्यात मात्र हे दोन महान नेते मनाने
जवळ आले. मतभेद कमी होऊन स्वातंत्र्यानंतर देशाचा कारभार कसा करायचा याविषयी विचारमंथन करण्यास त्यांना सवड मिळाली. नगरच्या किल्ल्यातून सर्वात शेवटी सुटका झाली ती सरदार पटेल यांची. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री म्हणून काम करताना सरदार पटेल यांनी भारताची एकता व सार्वभौमत्वासाठी संस्थाने खालसा करण्याचे फार मोठे काम केले. दुर्दैवाने त्यांना नंतर फार आयुष्य लाभले नाही. 1950 मध्ये त्यांचे निधन झाले.
पंतप्रधान म्हणून 1953 मध्ये पंडित नेहरू यांनी नगरच्या किल्ल्याला भेट दिली, तेव्हा सरदार पटेल यांच्या आठवणीने ते गहिवरले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळ‌ले. सरदारांची साथ आणखी काही वर्षे मिळायला हवी होती, असे त्यांचे उद्गार बरेच काही सांगून गेले. ज्या खोलीत सरदार पटेल राहिले, ती खोली सध्या रिकामी आहे. भिंतीवर सरदार पटेल यांची जुजबी माहिती व छायाचित्र असलेली तसबीर आहे. मजकूर इंग्रजीत असल्याने सर्वसामान्यांना तो समजत नाही. सरदार पटेल यांचे चरित्रग्रंथ, त्यांची दुर्मिळ छायाचित्रे, त्यांनी वापरलेल्या वस्तू, कपडे या कक्षात ठेवता येतील. सरदार पटेल यांचे भव्य संग्रहालय गुजरात सरकारने उभारले आहे. त्यांच्याकडून नगरच्या किल्ल्यातील कक्षासाठी सामग्री मिळू शकेल. पण हे करणार कोण? खासदार दिलीप गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवायचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी किल्ल्याला भेट दिली, तर राष्ट्रीय स्मारकाच्या रूपाने नगरच्या पर्यटनविकासाचे पर्व सुरू होऊ शकेल.
पंडित नेहरूंनी दाखवली पटेल यांची खोली
बारा राष्ट्रीय नेत्यांना किल्ल्यातील ज्या बराकीत ठेवण्यात आले होते, तेथील कोणत्या खोलीत कोण होते याबाबत प्रारंभी संभ्रम होता. 1945 मध्ये सरदार पटेल यांची सुटका झाल्यानंतर किल्ल्यातील तुरुंग बंद करण्यात आला. तेव्हा नियुक्त असलेले जेलरही परत गेले. नगरच्या प्रशासनाकडे याबाबत कोणतीही कागदपत्रे नाहीत. पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी मे 1953 मध्ये किल्ल्याला भेट दिली, तेव्हा त्यांनी स्वत: आपली खोली दाखवली. बराकीतील पहिल्या खोलीत आपण रहात नसून सरदार पटेल तेथे होते, हे पंडितजींनी सांगितल्यानंतर तशा नावाच्या पितळी पट्ट्या संबंधित खोल्यांवर लावण्यात आल्या.