आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांजोळी नरबळीप्रकरणी पोलिस चौकशीचा फार्सच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गेल्या महिन्यात वांजोळी (ता. नेवासे) येथे नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी ‘दिव्य मराठी’ व ‘अंनिस’ने पाठपुरावा केल्यामुळे पोलिस गावात आले खरे. पण, नरबळी प्रकरणी त्यांनी केलेली चौकशी हा अखेर ‘फार्स’च ठरला. गावात नरबळी देण्याचा प्रकारच झाला नसल्याचा निष्कर्ष उपअधीक्षक सुनील पाटील यांनी काढला आहे, तर पोलिसांनी ठरावीक लोकांकडेच चौकशी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वांजोळीत 24 मेला नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न भजनी मंडळ व ग्रामस्थांनी हाणून पाडला. ग्रामस्थांनी नरबळीची अघोरी पूजा करणाया काही लोकांना पकडून सोनई पोलिसांच्या ताब्यात दिले. गावातील एका राजकीय पुढायाने पोलिसांसोबत अर्थपूर्ण तडजोड करून हे प्रकरण मिटवले. त्यामुळे काही ग्रामस्थांनी याप्रकरणी पोलिस अधीक्षकांना लेखी निवेदन दिले. हे प्रकरण मिटवणाया राजकीय पुढायाच्या दहशतीमुळे नंतर तेही गप्प बसले.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ‘दिव्य मराठी’ व ‘अंनिस’च्या पदाधिकायांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तेथे नरबळी देण्याच्या अघोरी पुजेला मांडलेले साहित्य आढळून आले. ग्रामस्थांना गोपनीय माहिती देण्याचे आवाहन केल्यानंतर काही जणांनी माहिती दिली. यात ज्याचा बळी दिला जाणार होता, त्याच्या आईनेही आपली कैफियत मांडली. हे समजल्यानंतर गोपनीय माहिती देणाया ग्रामस्थांना राजकीय पुढायाकडून धमकावण्यात आले. त्याची दहशत असल्यामुळे या प्रकरणी ग्रामस्थ काहीच बोलत नाहीत.
याप्रकरणी, वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर शेवगाव उपविभागाचे उपअधीक्षक पाटील, सोनई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन वांगडे यांनी पथकासह बुधवारी (11 जून) वांजोळीत भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. परंतु, ठरावीक ग्रामस्थांकडेच त्यांनी चौकशी केली व नंतर आल्या पावली निघून गेले. याबाबत उपअधीक्षक पाटील यांनी, वांजोळीत जाऊन चौकशी केली, पण तेथे नरबळी देण्याचा प्रयत्न झालेला नाही, अशी माहिती दिली. तसेच चौकशी पूर्ण झाल्यानंतर बोलू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नरबळी प्रकरणाची झालेली पोलिस चौकशी, हा अखेर ‘फार्स’च ठरला असल्याचे स्पष्ट आहे.

पोलिसांनी केली गावातील ‘ठरावीक’ लोकांचीच चौकशी

नरबळी देण्याचा प्रयत्न भजनी मंडळाने हाणून पाडला. त्यानंतर सुमारे पाचशे ग्रामस्थांनी अघोरी पूजा करणाया काही आरोपींना पकडून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. त्यामुळे पोलिसांनी गावातील किमान शंभर लोकांकडे तरी चौकशी करणे अपेक्षित होते. पण, बुधवारी तीन तास केलेल्या चौकशीत पोलिसांनी ठरावीक लोकांचीच विचारपूस केली. यात ‘त्या’ रात्री पोलिसांसोबत तडजोड करणाया पुढायाचा समावेश होता. इतर ग्रामस्थांना चौकशीपासून अलिप्त ठेवण्यात आले. त्यामुळे या चौकशीत काय निष्पन्न झाले, ते कळायला मार्ग नाही.
नि:पक्षपणे चौकशी करण्याची गरज

पोलिस अधिकायांनी नरबळी प्रकरणाची माहिती घेण्यासाठी वांजोळी गावाला भेट दिली. पण, ज्यांनी प्रकरण मिटवले त्यांच्यासोबतच चौकशी केली. ग्रामपंचायत कार्यालयात ही चौकशी सुरू असताना व पिंपळाच्या झाडाखाली पाहणी करताना इतर ग्रामस्थांना तिकडे फिरकू दिले जात नव्हते. राजकीय पुढायाची दहशत पाहता पोलिसांनी ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करून या प्रकरणाची जाहीरपणे व नि:पक्षपातीपणे चौकशी करणे अपेक्षित होते. पण, तसे झालेले नाही. ज्या मुलांचे बळी दिले जाणार होते, त्यांच्या पालकांची विचारपूसही पोलिसांनी केली नाही. त्यामुळे ही चौकशी नसून ‘फार्स’च आहे.’’अ‍ॅड. रंजना गवांदे, कार्याध्यक्षा, अंनिस.

‘अंनिस’शी संभाषण टाळले
बुधवारी पोलिसांनी वांजोळीत चौकशी केल्याची माहिती ‘अंनिस’च्या जिल्हा कार्याध्यक्षा अ‍ॅड. रंजना गवांदे यांना समजली. गुरुवारी त्यांनी माहिती घेण्यासाठी उपअधीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधला. उपअधीक्षक पाटील यांनी आपण नाशिकला न्यायालयीन कामकाजात असल्याचे अ‍ॅड. गवांदे यांना सांगितले. तसेच वांजोळीत नरबळी देण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा पुनरूच्चर केला. याप्रकरणी शुक्रवारी सविस्तर बोलू, असेही ते म्हणाले. वांजोळीतील प्रकरण गंभीर असूनही त्यांनी अद्याप अंनिस पदाधिकायांचे म्हणणे ऐकलेले नाही, हे विशेष.

महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या शेतकयावर दबाव ?

ज्याच्या शेतात नरबळी देण्याचा प्रयत्न झाला. तो शेतकरी, पोलिस चौकशीला आले त्या दिवशी बेपत्ता होता. पोलिस त्याच्या शेतातील पिंपळाखाली गेले, तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. रात्री उशिरा तो परतला. गुरुवारी सकाळी गावातील काही लोक त्याच्या घरात ठाण मांडून होते. त्यानंतर तो पुन्हा बेपत्ता झाला. या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करणे अपेक्षित होते. पण, त्याची चौकशी न करताच ‘नरबळी देण्याचा प्रयत्न झालेला नाही, ’ या निष्कर्षाप्रत पोलिस कसे आले, ही आश्चर्याची बाब आहे.