आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंतराव नाईक महामंडळात अडीच कोटींचा गैरव्यवहार,सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळात अडीच कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१२ ते जानेवारी २०१३ या कालावधीत घडला आहे. तब्बल तीन वर्षांनी हा अपहार उजेडा आला असून महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक बी. एल. नाईक यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यावरुन सहाजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपींमध्ये नाशिकच्या निलंबित महाव्यवस्थापकाचाही समावेश आहे.
तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक अशोक वि. नागरे (पंचरत्न ग्रीन व्हिलेज, प्लॉट नं. ४०२, बिल्डिंग नं. २०, मशाचा पाडा रोड, काशिगाव, मीरा रोड, जि. ठाणे), योगेश बाबासाहेब सानप (रा. बीड), गणेश बाबासाहेब सानप (रा. बीड), रवींद्र शंकर कांबळे (रा. के १०२, विजया पार्क पहिला मजला, सुप्रीम पार्कसमोर, मीरा रोड, जि. ठाणे), निलंबित महाव्यवस्थापक प्रमोद नीळकंठ चव्हाण (रा. ज्योतिष गुरुच्या घरासमोर, समर्थनगर, वडाळा, पाथर्डी रोड, जि. नाशिक) अशी आरोपींची नावे अाहेत.

आरोपींनी संगनमत करून वसंतराव नाईक महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून एनबीसीएफडीसी, नवी दिल्ली योजनेंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमातीमधील ५० लाभार्थी अर्जदारांना त्यांच्या नावे प्रत्येकी लाख रुपयांप्रमाणे पन्नास धनादेश दिले. मात्र, त्यासाठी लाभार्थींची बनावट कागदपत्रे, जातींचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे लाख रुपयांचे पन्नास धनादेश अलाहाबाद बँकेच्या नगर शाखेत महामंडळाच्या खात्याच्या नावे दिले. नंतर हे धनादेश बीड मध्यवर्ती सहकारी बँकेत वटवून अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली.
ही बाब तीन वर्षांनी उजेडात आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. तपास शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे कोतवालीचे पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप पाटील करत आहेत. गुन्ह्यातील अपहाराची रक्कम मोठी असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.