आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या ‘वसुंधरा’ महोत्सवास सुरुवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - हरित नगर व पर्यावरण संवर्धनाकरिता महापालिकेने हाती घेतलेल्या ‘वसुंधरा’ महोत्सवास सोमवारी सुरुवात झाली. विनायकनगर येथील मातोर्शी उद्यानात महापौर शीला शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
हरित नगर व पर्यावरण संवर्धनाकरिता 9 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत लोकसहभागातून वृक्ष दत्तक योजना, स्मृती उद्यान, प्रथम जन्मदिनी वृक्षारोपण, वृक्षलागवड, संगोपन आणि जनजागृती अभियान यासारखे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. महापौर शिंदे म्हणाल्या, स्वच्छ, सुंदर व हरित नगरची संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी शहरात मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वसुंधरा महोत्सवाला केवळ शासकीय स्वरूप न राहता लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे. त्यासाठी महोत्सवात जास्तीत जास्त नगरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
महोत्सवाच्या माध्यमातून महापालिका शहरातील मोकळ्या जागा व रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करणार आहे. त्यातील एक किंवा त्यापेक्षा अधिक वृक्ष नागरिकांनी संगोपन व संरक्षणासाठी दत्तक घेणे, दिवंगत नातेवाईकांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी स्मृतीदिनी वृक्षलागवड करून त्यांचे तीन वष्रे संगोपन करणे, त्याचबरोबर वाढदिवस व जन्मदिनी वृक्षलागवड करणार आहे. महोत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांच्या सूचनेप्रमाणे संबंधित व्यक्तींच्या आठवणीकरिता प्रत्येक वृक्षावर नाव लावण्यात येणार आहे. यावेळी 23 नागरिकांनी वृक्ष दत्तक घेऊन त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचबरोबर उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथही घेतली. यावेळी आयुक्त विजय कुलकर्णी, उपमहापौर गीतांजली काळे, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, स्मिता झगडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती किरण उनवणे, उपसभापती मालन ढोणे, विरोधी पक्षनेते विनित पाऊलबुधे, सभागृह नेते बाबासाहेब वाकळे, नगरसेवक गणेश भोसले, नितिन शेलार, शारदा ढवण, हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर आदी उपस्थित होते.