आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायडर चर्चची मालमत्ता ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-वायडर चर्च मिनिस्ट्रीज व मराठी मिशन विश्वस्त संस्थेच्या मालकीची मालमत्ता ताब्यात घेऊ नये, या मागणीसाठी नगर जिल्हा प्रिस्ट असोसिएशनतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

असोसिएशनचे अध्यक्ष पास्टर ताराचंद चक्रनारायण यांच्या नेतृत्वाखाली क्लेरा ब्रुस मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. ख्रिस्ती मालमत्ता बळकावणार्‍या शरद मुथ्था आणि धारिवाल या लँड माफियांचा जाहीर निषेध अशा आशयाची फलके घेऊन हा मोर्चा क्लेरा ब्रुस मैदान, मार्केट यार्ड, बंगाल चौकी, माणिक चौक, कापडबाजार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

असोसिएशनचे उपाध्यक्ष एस.डी.नाईक, सचिव एम. एस. पडागळे, सहसचिव सी. बी. अजागरे, तेजपाल उजागरे, डेव्हिड रावडे, प्रकाश बल्लाळ, एम. एस. सावंत, डॉ. सॅमसन त्रिभुवन, राजू देठे यांच्यासह धर्मगुरू सहभागी झाले होते. त्यानंतर ताराचंद चक्रनारायण यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, क्लेरा ब्रुस मैदान व या परिसरातील मुलींचे वस्तीगृह वायडर चर्च मिनिस्ट्रीज व मराठी मिशन विश्वस्त संस्थेच्या मालकीचे आहेत. मात्र ही मालमत्ता शरद मुथ्था हे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेचे सामाजिक व संस्कृतीत जडणघडणीत मोठे योगदान राहिले आहे. ही जागा कायमस्वरूपी विश्वस्तांच्या ताब्यात असल्याचा करार आहे.तरीही काही विश्वस्तांनी ही मालमत्ता बेकायदेशीर हस्तांतरण करून बिल्डरला देण्याचा डाव आखला आहे.ही जागा सदर बिल्डर मुथ्था यांनी देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सीबीआय चौकशी करा
या जागेबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. धार्मिक संस्थेची जमिन विक्री करता येत नाही, मात्र काही विश्वस्तांनी या जागेचा व्यवहार केला. संस्थेची मालमत्ता कुणाला देण्यास ख्रिस्ती समाजाचा विरोध आहे. मुठभर विश्वस्तांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी बिल्डर माफियांना ही जागा विकण्याचा घाट घातला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. ज्यांनी ही जागा घेतली त्यांच्यावर न्यायालयात दावा दाखल करू. विक्री स्थगितीसाठी लवकरच खंडपीठात याचिका दाखल करू.’’ ताराचंद चक्रनारायण, अध्यक्ष, जिल्हा प्रिस्ट असोसिएशन.