आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरमाता व वीरपत्नींचा एमआयआरसीत सन्मान, २५०० हून अधिक माजी सैनिकांची उपस्थित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माजी सैनिकांचे आरोग्य व इतर प्रश्न सोडवण्यासाठी नगरच्या मेकॅनाईज्ड रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) येथे रविवारी झालेल्या मेळाव्यात नगर, सोलापूर, बीड, लातूर, कल्याण जिल्ह्यांतील सैनिकांनी उपस्थिती नोंदवली. शहीद वीरांच्या माता व पत्नींचा एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. एस. वर्मा यांच्या पत्नी अनिता यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

भारतीय लष्कर आपल्या सैनिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आखत असते. सैनिक निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या कल्याणासाठी लष्कराचे बारकाईने लक्ष असते. लष्कराच्या या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एमआयआरसीमधील हरपाल स्टेडियममध्ये हा मेळावा झाला. या मेळाव्यात लष्कर व नौदलाचे (नेव्ही) निवृत्त सैनिक, त्यांचे कुटुंबीय, वीरमाता आणि वीरपत्नी उपस्थित होत्या.

मेळाव्यासाठी येणारे सैनिकांना त्यांना येणाऱ्या विविध अडचणींचे निवारण करण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आले होते. विशेषत: निवृत्तीवेतनाबाबत अडचणी सोडवण्यासाठी तेथे वेतन लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सैनिकांच्या निवृत्ती वेतन व इतर भत्ते मिळण्याबाबतच्या अडचणींचे त्याच दिवशी निवारण केले. विशेष म्हणजे कागदपत्रांच्या नकला काढण्यासाठी सैनिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जागेवरच झेरॉक्स प्रती मिळण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.

मेळाव्यासाठी आलेल्या सैनिकांची तेथे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात हाडांचे विकार, नाक, कान, डोळे याबाबत औषधोपचार व शस्रक्रियांचा सल्ला देण्यात आला.

या मेळाव्यात बँकांकडून निवृत्ती वेतनाबाबत मिळणाऱ्या सर्व सुविधा व योजनांची माहिती, तसेच निवृत्त सैनिकांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक संस्थांत असलेल्या आरक्षणाबाबत या मेळाव्यात माहिती देण्यात आली. या सैनिकांना कमांडंट ब्रिगेडिअर वर्मा, तसेच स्टेन कमांडर ब्रिगेडिअर जी. एस. संगेरा यांनी मार्गदर्शन केले. राज्य सैनिक बोर्डाचे उपसंचालक मेजर (निवृत्त) तुंगार यावेळी उपस्थित होते.

सैनिकांनी मेळाव्यातील सुविधांचा लाभ घेत आयोजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सैनिकांना मेळाव्यास येण्यासाठी रेल्वेस्टेशन व बसस्थानकापासून एमआयआरसीपर्यंत खास बसची व्यवस्था करण्यात आली होती.
कँटिनची सुविधा उपलब्ध
लष्कराकडून मिळणाऱ्या कँटीनची सुविधा या मेळाव्यात उपलब्ध करण्यात आली होती. माजी सैनिकांनी तिचा लाभ घेतला. केंद्र सरकारकडून निवृत्त सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र सूचना कक्ष उभारण्यात आला होता. निवृत्त सैनिकांचे पाल्य, नातेवाईक यांच्यासाठी लष्करातर्फे घेण्यात येणाऱ्या भरती कार्यक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली. सैनिकांसाठी खास ‘बड्या खान्या’चेही आयोजनही या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले होते.