आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vegetable Distributors In Savedi Movement Take On Corporation

सावेडीतील भाजीविक्रेत्यांचे मनपासमोर धरणे आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सावेडीतील एकविरा चौकातील भाजीविक्रेत्यांनी बुधवारी महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. प्रशासनाने त्यांना रस्त्यावर बसण्यास मनाई करून सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलात तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु भाजीविक्रेत्यांनी तेथे बसण्यास नकार देत धरणे आंदोलन केले. प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक स्वप्नील शिंदे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी एकविरा चौकातील भाजीविक्रेत्यांवर मंगळवारी कारवाई केली. भाजीविक्रेते रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे या भाजीविक्रेत्यांना सावित्रीबाई संकुलात तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, त्यांनी तेथे बसण्यास नकार दिला. मंगळवारी त्यांनी रास्तारोको केला, परंतु प्रशासनाने त्यांच्यावर पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. त्यामुळे संतापलेल्या भाजीविक्रेत्यांनी बुधवारी आंदोलन केले. आयुक्त विलास ढगे यांच्या दालनासमोरही ठिय्या देण्यात आला. पथ विक्री नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करावी, भाजीविक्रेत्यांना परवाना द्यावा, पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी , असे भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे. आयुक्त ढगे यांनी त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले, परंतु कारवाईच्या भूमिकेवर ते ठाम राहिले.

८६ भाजीविक्रेत्यांना संकुलात जागा
सावित्रीबाईफुले संकुलात ८६ भाजीविक्रेत्यांना बसता येईल, एवढीच जागा आहे. उर्वरित भाजीविक्रेत्यांना तेथे बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी गैरसाेय होऊ नये, यासाठी विजेचे दिवे लावण्यात आले आहेत. वाहन पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भाजीविक्रेते एकाच ठिकाणी आल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

इतर भाजीविक्रेत्यांवर कारवाई कधी?
शहराच्याविविध भागात रस्त्यावरच भाजीविक्रेते बसतात. त्यामुळे सर्वत्रच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकविरा चौकातील भाजीविक्रेत्यांप्रमाणेच इतर भागातही कारवाई होणे गरजेचे आहे. चितळे रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना नेहरू मार्केटची जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, भाजीविक्रेते तेथे बसता चितळे रस्त्यावरच पथारी मांडतात.

एकवीरा चौक परिसरातील सर्व भाजीविक्रेत्यांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी पथारी व्यावसायिक पंचायतच्या वतीने बुधवारी महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.