आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांना मिळणार घरपोहोच भाजीपाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आधुनिक तंत्रज्ञानाच्या सध्याच्या युगात तरुणाई आपली नाळ विसरत चालली आहे, अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. पण पारनेर तालुक्यातील भोयरे पठारचा लक्ष्मण कृषी बचत गट मात्र याला अपवाद ठरला आहे. या गटातील युवकांनी शेतीला आधुनिक टच देत एक नवा उपक्रम सुरू केला आहे. या गटाच्या माध्यमातून नगरकरांना आता घरपोहोच भाजीपाला मिळणार आहे.
या गटामध्ये 20 महाविद्यालयीन युवक-युवतींचा समावेश आहे. या सर्वांची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतीशी निगडित आहे. शिक्षणासाठी हे सर्वजण नगरमध्ये आले असले, तरी स्वत:च्या पायावर उभे राहात त्यांनी शेतीला चालना देण्यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक’ असा ‘घरपोच भाजीपाला’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांच्या हस्ते नुकतेच झाले. सुडके मळा परिसरातील कृषी भोजनालय येथे 20 मे रोजी दुपारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र दरेकर, कृषी सहायक अरुण साठे आदी उपस्थित होते.
आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक विठ्ठल गुंजाळ व खानेदेशे यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. या गटातील सर्व सदस्य न्यू आर्टस्, कॉर्मस अँड सायन्स कॉलेजचे आजी-माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे या उपक्रमाचा मला अभिमान आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसाय करून स्वावलंबी व्हावे, असे खानदेशे म्हणाले. बचत गटाचे अध्यक्ष रामभाऊ उरमुडे व व्यवस्थापक सागर उरमुडे म्हणाले, स्वत:च्या शेतातील भाजीपाला नगरकरांना परवडेल अशा दरामध्ये आम्ही घरपोच देणार आहोत.शेतकर्‍यांना चांगला भाव मिळाला नाही, तर त्यांचा मालही या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल.