आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालेभाज्या स्वस्त, पण कांदा रडवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या महिन्यांत भाजीपाल्याचे भाव किलोमागे 20 रुपयांनी वाढल्यामुळे महिलांचे ‘बजेट’ कोलमडले होते. पण आता आवक वाढल्यामुळे पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. गेल्या महिन्यात 40 रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची जुडी आता 5 रुपयांवर आली आहे. कांद्याचे भाव मात्र वाढत असून कांदा डोळ्यात पाणी आणणार हे निश्चित.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील भाजीपाला काढून पेरणीसाठी जमिनी तयार केल्या. त्यामुळे दीड महिन्यापूर्वी आवक कमी होऊन पालेभाज्यांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. नगरच्या बाजारात नगर तालुका, र्शीगोंदे व इतर तालुक्यांतून भाजीपाला येतो. सध्या आवक वाढल्यामुळे पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत.

मेथी, पालक, कोथिंबीर व शेपूचे स्वस्त असले, तरी वांगी, टोमॅटो, गवार, भेंडी, पत्ताकोबी, दोडका, सिमला मिरची, शेवगा यांचे भाव मात्र चढेच आहेत.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपआवारामध्ये गुरुवारी कांद्याची चांगली आवक झाली. एक नंबरच्या कांद्याने अडीच हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला. गेल्या आठवड्यात या कांद्याला 2 हजार 200 रुपये भाव मिळाला होता. बाजारात कांदा 30 रुपये किलो दराने विकला जात आहे. येत्या काही दिवसांत आवक कमी झाली, तर कांद्याचे भाव नगरकरांच्या डोळ्यात पाणी आणतील.

नेप्ती उपआवारात सोमवार, गुरुवार व शनिवारी कांद्याचे लिलाव होतात. सध्या कांद्याचे भाव वधारले असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, असे सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी सांगितले

पालेभाज्यांची आवक वाढली असल्याने आणखी काही दिवस भाव स्थिर राहतील. कांदा व गवारची आवक मात्र कमी झाली आहे. त्यामुळे कांदा महाग झाला आहे, असे भाजीपाला विक्रेते बाळासाहेब तरोटे यांनी सांगितले. रमजानचा महिना सुरू झाल्याने फळांचे भाव मात्र वाढू लागले आहेत.डाळिंब, मोसंबी, सफरचंद, केळी, पिअर आदी फळांना मागणी आहे.

सध्याचे दर
हिरवी मिरची 32, कांदे 30, फुलकोबी 64, टोमॅटो 40, वांगे 24, गवार 60, आले 200, काकडी 20, भेंडी 48, पत्ता कोबी 32, लिंबू 24, दोडका 64, मेथी 5 (जुडी), पालक 5 (जुडी), कोथिंबीर 5 (जुडी), दुधी भोपळा 20, सिमला मिरची 64, शेवगा 80, कारले 64, कैरी 32, मोसंबी 50, डाळिंब 120.