आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालेभाज्या सामान्यांच्या आवाक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील भाजीपाल्याचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे नगरच्या बाजारपेठेतील भाजीपाल्याचे भाव बर्‍याच दिवसांनंतर नगरकरांच्या आवाक्यात आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी 160 रुपये किलोवर पोहोचलेल्या गावरान लसणाच्या दरात तब्बल 35 रुपयांची घसरण झाली. शेवग्याच्या शेंगांनी मात्र शंभरी गाठली.

यावर्षी पावसाने सुरुवातीलाच दमदार हजेरी लावली होती. परतीचा पाऊस मात्र लांबला होता. शिवाय जिल्ह्यातील बहुतांश भागात, तर सुरुवातीचा पाऊसही पडलेला नव्हता. उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड कमी झालेली होती. पावसामुळे खरिपाला जीवदान मिळाले. साहजिकच बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली. त्यामुळे भाजीपाला नगरकरांच्या आवाक्यात आला आहे.

गेल्या दोन महिन्यांमध्ये रमजान, र्शावण, नवरात्रोत्सवाचे उपवास होते. उपवासाचे दिवस संपताच भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात भाजीपाल्याची आवक मात्र पुरेशी होत नव्हती. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा होता. आता खरिपाचा माल बाजारात दाखल झाल्यामुळे पालेभाज्यांचे भाव आवाक्यात आले आहेत. त्यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला आहे.

सध्या गावरान लसूण 125 रुपये किलो, तर हायब्रीड लसूण 60 रुपये किलो आहे. शेपू व कोथिंबिरीची जुडी पुन्हा दोन रुपयांनी महागली. वाल व गवारच्या शेंगांचे दरही आवाक्यात आले आहेत. टोमॅटो, भेंडी, दुधी भोपळ्याचे भावही चांगलेच उतरले आहेत. अचानक आवक बंद झाल्यामुळे सोमवारी हिरवा वाटाणा व शेवग्याच्या शेंगांचा भाव 100 रुपये किलो होता. आवक जोरात असल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव काही दिवस स्थिर राहतील, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.

पालेभाज्यांचे बाजारभाव (प्रतिकिलो)
लवंगी मिरची- 40 रु., हिरवी मिरची- 25 रु., कांदा- 50 रु., बटाटा- 18 रु., दुधी भोपळा- 32 रु., कोबी- 30 रु., टोमॅटो- 15 रु., शेवगा- 100 रु., भेंडी- 40 रु., सिमला मिरची- 30 रु., वांगे- 60 रु., गावरान लसूण- 125 रु., हिरवा वाटाणा- 100 रु., हायब्रीड लसूण- 60 रु., लिंबू- 40 रु., गवार- 80 रु., वाल- 40 बीट- 10 रु. (3 नग), भुईमूग शेंग- 60 रु., काकडी- 30 रु., तोंडले- 60 रु., दोडके- 60 रु., शेपू- 8 रु. जुडी, कोथिंबीर- 10 रु. जुडी, मेथी- 10 रु. जुडी, पालक- 10 रु. जुडी.

शेवगा अचानक महाग
गेले काही महिने भाजीपाला आवाक्याबाहेर गेल्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले होते. परंतु आता बाजारात ताजा माल यायला सुरुवात झाल्यामुळे पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महागाईमुळे तिखट झालेला गावरान लसूण, हिरवी मिरची आता थोडीफार आवाक्यात आली आहे. अचानक आवक मंदावल्यामुळे हिरवा वाटाणा व शेवग्याच्या शेंगा मात्र सध्या शंभर रुपये किलो दराने मिळत आहेत.’’ सुनीता कुलकर्णी, गृहिणी, नगर.