आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडचणीत भर: गवार, दोडके आणि वाटाण्याला महागाईची फोडणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात काही भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. कांदा तसेच भेंडी, गवार, दोडके यासारख्या भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. विशेष म्हणजे मार्च महिन्यात हे दर आणखी वाढणार असल्याचे भाजीविक्रेते सांगतात.

शहरात चितळे रस्ता, अमरधाम येथील भाजी बाजार, प्रोफेसर कॉलनी चौक, गुलमोहर व पाइपलाइन रस्ता, भिस्तबाग नाका आदी ठिकाणी रोज लहान-मोठा भाजी बाजार भरतो. मात्र, सर्व ठिकाणांचे भाज्यांचे दर वेगवेगळे आहेत. अमरधाम येथे भरणार्‍या भाजी बाजारात दर कमी असले, तरी इतर ठिकाणी मात्र भाज्यांच्या दरात मोठय़ा प्रमाणात तफावत आहे. अमरधाम येथील भाजी बाजारात 10 रुपयांना मिळणार्‍या भाजीसाठी इतर ठिकाणी मात्र, 15 ते 20 रुपये मोजावे लागतात. जवळपास सर्वच भाजीविक्रेते मार्केट यार्ड येथून होलसेल दरात भाजी खरेदी करतात. त्यानंतर ते शहरातील विविध भागांत पथारी मांडून भाजी विकतात. मात्र, उन्हाळा सुरू झाल्याने सध्या मार्केट यार्डमध्ये येणार्‍या भाजीपाल्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनाही काही वेळा जास्त दरात भाजी खरेदी करावी लागते. काही भाजीविक्रेते शहरातील वेगवेगळ्या वसाहतींमध्ये फिरून थेट घरपोहच भाजी देतात. त्यामुळे नागरिकही घराबाहेर न पडता, दारावरच भाजी खरेदी करणे पसंत करतात. मात्र, त्यासाठी त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात.

सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात काही भाज्यांचे दर अमरधाम येथील भाजी बाजारापेक्षा दुप्पट आहेत. असे असले तरी भाज्या जवळ मिळत असल्याने अनेक नागरिक जास्त पैसे देऊन भाजी खरेदी करतात. चितळे रस्त्यावरही असाच प्रकार आहे, खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेले नागरिक जाताना चितळे रस्त्यावरून भाजीपाला खरेदी करतात. मागील दोन महिन्यांच्या तुलनेत काही भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. कांद्याचे दर थेट 30 रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यापाठोपाठ भेंडी, गवार, दोडके, शेवगा यांचे दरही 50 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना पिशवीभर भाजीपाल्यासाठी 400 ते 500 रुपये मोजावे लागतात. मार्च व एप्रिल महिन्यात भाज्यांचे दर आणखी वाढणार असल्याचे भाजीविक्रेते सांगतात.

भाजी बाजारातील दर (किलोप्रमाणे)
कांदा - 30 रुपये
गवार - 100 रुपये
भेंडी - 50 रुपये
काकडी - 20 रुपये
दोडके - 50 रुपये
कोबी - 15 रुपये
मेथी - 10 रुपये
वाटाणा - 30 रुपये
बटाटा - 20 रुपये
टोमॅटो - 12 रुपये.

दुष्काळी परिस्थितीचा परिणाम
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्‍यांना भाजीपाला पिकवणे कठीण झाले आहे. शेतकर्‍यांकडे जो भाजीपाला होता, तो यापूर्वीच बाजारात आला आहे. सध्या जो काही थोडाफार भाजीपाला शिल्लक आहे, तो बाजारात येतो, पण त्यासाठी आम्हालाच जास्त पैसे मोजावे लागतात.
-रमेश ताठे, भाजीविक्रेता, प्रोफेसर कॉलनी चौक.

आर्थिक नियोजन कोलमडले
दर वाढल्याने भाज्या खरेदी करणे अवघड झाले आहे. अर्धा किलो भाजीसाठी 20 ते 50 रुपये खर्च करावे लागतात. पुढच्या महिन्यात दर आणखी वाढल्यास भाज्या खाव्यात की नाही, असा प्रश्न निर्माण होणार आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- पंकज तांबोळी, ग्राहक.