आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - टंचाई निवारणावर जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 209 कोटी रुपये खर्च केले असले तरी दुष्काळाची दाहकता वाढतच आहे. जिल्ह्यातील 196 गावे व 797 वाड्या-वस्त्यांना सध्या 223 टँकर्सने पाणीपुरवठा सुरू आहे.
दुष्काळाच्या वणव्यात होरपळणा-या नगरची पाठ यंदाही दुष्काळाने सोडलेली नाही. उत्तर भागातील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव व राहुरी या सहा तालुक्यांना दुष्काळाची झळ फारशी जाणवत नाही. मात्र, दक्षिणेकडील नगर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत, पारनेर व श्रीगोंदे या तालुक्यांत मात्र यंदाही कमी पाऊस झाल्याने पारनेर, पाथर्डी, जामखेड, कर्जतला सर्वाधिक झळा येथील स्थिती गंभीर झाली आहे.
सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील 247 गावे व 1043 वाड्यांमध्ये पाणीटंचाई होती. या गावांना 260 टँकर्सने पाणीपुरवठा सुरू होता. सध्या 196 गावे व 797 वाड्या-वस्त्यांना 223 टँकर्स सुरू आहेत. पाण्याबरोबरच जनावरांच्या चा-या चा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या 185 छावण्या सुरू असून त्यात 1 लाख 18 हजार जनावरे आहेत. संगमनेर तालुक्यातील पठारी भागातही पाणी व चाराटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय असून या व्यवसायाला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. दूधनिर्मितीत सुमारे 30 ते 40 टक्क्यांनी घट झाली आहे.
जून, जुलै व आॅगस्ट हे तिन्ही महिने कोरडे गेल्याने खरीप हंगाम पूर्णपणे गेला. रब्बी हंगामात तरी समाधानकारक पाऊस होईल, अशी आशा शेतक-या ंना होती. तथापि, समाधानकारक पाऊस न झाल्याने बहुतांशी भागात रब्बीच्या पेरण्या झाल्याच नाहीत. ज्या भागात पेरण्या झाल्या, त्या भागातील पिके नंतर पाण्याअभावी जळून गेली. पाण्याअभावी संत्र्यांच्या बागा जळून गेल्या आहेत.
काँग्रेसच्या मंत्र्यांनी फिरवली पाठ : अनेक भागात वेळेवर टँकर्स येत नाहीत. छावण्यांतील जनावरांसाठी चारा वेळेवर उपलब्ध होत नाही. टँकरची इंधन बिले मागील सहा महिन्यांपासून मिळालेली नाहीत. रोहयोची कामे सुरू असली तरी मजुरांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे अनेक भागात मजुरांनी रोहयोकडे पाठ फिरवली आहे. नगर जिल्ह्याला महसूल व कृषीसारखे महत्त्वाचे मंत्रिपद मिळाले आहे. मात्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप एकाही दुष्काळी तालुक्याला भेट दिलेली नाही.
शिल्लक पाणीसाठा : भंडारदरा धरणात सध्या 50.48 टक्के, मुळा धरणात 36.86 टक्के, तर निळवंडे धरणात 32.42 टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या आढळा धरणात 44.81 टक्के, सिना धरणात 1.89, खैरी 1 टक्का, तर विसापूरमध्ये 5.73 टक्के पाणीसाठा आहे.
टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना
मी स्वत: दुष्काळी भागात 40 हून अधिक दौरे केले आहेत. दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. टँकर मंजुरीचे अधिकार आता तहसीलदारांना देण्यात आले आहेत. छावण्यांबाबतच्या नियमांत बदल करण्यात आले असून मंडलनिहायऐवजी आता गावपातळीवर छावण्या सुरू करण्यात येणार आहेत.’’ बबनराव पाचपुते, पालकमंत्री
धरणांत पुरेसा साठा
भंडारदरा व मुळा धरणात समाधानकारक साठा असून आगामी सहा महिने तरी टँकरसाठी पाण्याची टंचाई भासणार नाही. दुष्काळाच्या नियोजनाचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. सर्वाधिक 55 टँकर्स पारनेर तालुक्यात आहेत. त्याखालोखाल नगर 42, कर्जत 44, जामखेड 22 व श्रीगोंदे येथे 23 टँकर्स सुरू आहेत. ’’ डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.