आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरु डॉ. मोरे यांना पदमुक्त करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कनिष्ठ संशोधन सहायक भरतीतील गैरव्यवहारप्रकरणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे यांना पदमुक्त करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देऊन 11 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विद्यापीठामार्फत 2011 मध्ये कनिष्ठ संशोधन सहायक पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. विद्यापीठात कार्यरत असणार्‍या व्यक्तींच्या नातेवाईकांचा भरती झालेल्यांत सर्वाधिक भरणा आहे. भरतीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संचालकांकडून चौकशी करण्यात आली. यात कुलगुरुंवर ठपका ठेवत गैरव्यवहार झाल्याचे मान्य करण्यात आले. या चौकशी अहवालाच्या आधारावर कुलगुरु मोरे यांना पदमुक्त करून भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
याप्रकरणी विद्यापीठस्तरीय चौकशी समितीचा अहवाल पंधरा दिवसांत सादर होईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी दिली होती. मात्र, चौकशीचे गुर्‍हाळ अजूनही सुरूच आहे. विद्यापीठामार्फत 2010 मध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या अंतर्गत पहारेकरी पदाच्या झालेल्या भरतीत मृत उमेदवाराची मुलाखत घेऊन गुणदान करण्याचा करिष्मा निवड समितीने साधला. यावर विद्यापीठ प्रशासनाने मुलाखतीच झाल्या नसल्याचे सांगत हात वर केले. संबंधित निवड समितीवर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या मागणीला संबंधितांनी केराची टोपली दाखवली.
विखे यांनी दोषींना पाठीशी घालणार नसल्याचे आश्वासन दिले. विद्यापीठाला जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांचे वारस विद्यापीठात नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना डावलून जवळच्या व्यक्तींना सामावून घेण्याचा प्रकार विद्यापीठात सुरू असल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे.
कोणत्याही क्षणी आंदोलन
कृषिमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने कारवाई अपेक्षित आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करू. कारवाई झाली नाही, तर बेमुदत उपोषण करणार आहोत. प्रकल्पग्रस्तांनाही या आंदोलनात सहभागी करून घेणार आहोत. दोषींवर कारवाई झाल्याखेरीज आंदोलन मागे घेण्यात येणार नाही.’’ राजेश परकाळे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.
प्रतिसाद नाही
यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलसचिव सुनील वानखडे यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. मीटिंगमध्ये असल्याचा ‘एसएमएस’ त्यांनी पाठवला. ‘एसएमएस’ मार्फत त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वानखेडे यांनी प्रतिसाद दिला नाही.