आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण - विधानपरिषदेसाठी शेलार आघाडीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हायकमांड’ने प्रत्येक निवडणुकीत दिलेले वचन यंदा पूर्ण केल्यास जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांना आमदारपदाची संधी मिळण्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेसाठी होणार्‍या निवडणुकीकरिता राष्ट्रवादीच्या वतरुळात जिल्ह्यातून शेलार यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
शेलार यांचा राजकीय प्रवास पाहिल्यास त्यांना पदाने सतत हुलकावणी दिल्याचे दिसते. हाता-तोंडाशी आलेला घास अनेकदा त्यांच्याकडून हिसकावून घेतला गेला आहे. 30 वर्षांच्या राजकीय प्रवासात शेलारांचा राजयोग जुळलेला नाही. कुशल संघटक असलेल्या शेलारांचा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. मात्र, आमदारपदाची संधी समोर येताच कायम त्यांना थांबवण्याचा सल्ला देऊन त्यांची उपेक्षा करण्यात आल्याची भावना त्यांच्या निकटवर्तीयांत आहे.
विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 11 जागांसाठी या महिनाअखेरीस निवडणूक होत आहे. पक्षीय बळाचा विचार केल्यास राष्ट्रवादीच्या वाट्याला किमान तीन जागा मिळतील, असे दिसते. राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकी मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. नगर जिल्ह्यातून शेलार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या नावास पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते व जिल्हास्तरीय नेत्यांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभेऐवजी विधान परिषदेद्वारे आमदारकी मिळवणे शेलारांना फायदेशीरही आहे. गेल्यावेळी शेलारांचे नाव निश्चित झाले. मात्र, अचानक उषा दराडे (बीड) यांचे नाव पुढे आल्याने त्यांना थांबावे लागले. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शेलारांना पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. मात्र, एक तपाहून अधिक काळ लोटूनही तो पूर्ण झाल्याचे दिसत नाही. भविष्यात संधी देण्याच्या आश्वासनावर त्यांना थांबवण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, शेलार यांनी अद्यापि आशा सोडलेल्या नाहीत.
तर श्रीगोंद्याला लाभतील तीन आमदार - पालकमंत्री बबनराव पाचपुते हे तालुक्याचे आमदारपद भूषवत आहेत. एक अपवाद वगळता ते सतत विजयी झाले. तालुक्यात एकच आमदारपद असताना अरुण जगताप (बनपिंप्री) यांना विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून संधी मिळाली. त्यामुळे तालुक्याला दोन आमदार मिळाले. शेलारांना संधी मिळाल्यास तालुक्याला तिसरा आमदार मिळण्याची शक्यता आहे.