आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त विडी कामगारांची निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बंद असलेले विडी कारखाने पूर्ववत सुरू करावेत बंद कालावधीतील कामाची भरपाई मिळावी, या मागणीसाठी राज्य विडी कामगार फेडरेशन, लाल बावटा विडी कामगार युनियन नगर विडी कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी माळीवाडा बसस्थानकाजवळील शिवपुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. रणरणत्या उन्हात महिलांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

केंद्रीय आरोग्य विभागाकडून विडी बंडलांवर ८५ टक्के धोका चित्र छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अटीची अंमलबजावणी करण्यास विडी कारखान्यांनी असमर्थता दाखवत एप्रिलपासून बेमुदत बंद पुकारला आहे. परिणामी शहर जिल्ह्यातील हजारो विडी कामगारांवर बेराेजगारीची कुऱ्हाड कोसळली. राज्य सरकारने केंद्राशी संवाद साधून धोकाचित्राची अट ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास भाग पाडण्याच्या मागणीसाठी विडी कामगार सातत्याने आंदोलन करत आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कामगारांनी धरणे धरले होते. समाधानकारक तोडगा काढून विडी कारखाने तातडीने सुरू करावेत, बंद कालावधीतील रोजगार नुकसान भरपाई म्हणून देण्याची मागणी करणारे निवेदन खासदार दिलीप गांधी यांच्या नावे देण्यात आले.

याच मागणीसाठी १५ ते २५ फेब्रुवारीदरम्यान विडी कारखाने बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकार कारखानदार यांच्यातील वादात कामगार भरडला जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. इम्पिरियल चौकातून शहरात येणाऱ्या रस्त्यावर ठाण मांडून कामगारांनी रास्ता रोको आंदोलनही केले. कारभारी उगले, शंकर न्यालपेल्ली, शंकरराव मंगलारप, निवृत्ती दातीर, सुधीर टोकेकर, बुचम्मा श्रीमल, शोभा बिमन, कविता मच्चा, लक्ष्मी कोडम, कमला दोंता, पुरुषोत्तम बोगा, चंद्रकांत मुनगेल, सरोजनी दिकोंडा, लक्ष्मी भरताल, कमल गेंट्याल, शमीम शेख, विजया श्रीगादी आदींसह विडी कामगार महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.