आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औटींच्या खुलाशाशिवाय माघार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पारनेर पंचायत समितीचे सदस्य गणेश शेळके यांनी पत्रकार परिषदेत आमदार विजय औटी यांना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे नाव खटकले, असा सांगितल्यानंतर नगर तालुक्यातील पारनेर मतदारसंघाला जोडलेल्या गावांत औटींच्या फलकावरील नावांना काळे फासण्याचे सुरू झालेले सत्र दुसर्‍या दिवशीही चालूच होते. जिल्हाप्रमुख गाडे यांच्याविषयी आमदार औटी यांची भूमिका काय, याचा खुलासा केल्याशिवाय माघार नाही, असे नगर तालुक्यातील शिवसैनिकांनी ठरवले आहे.

वाडेगव्हाण (ता. पारनेर) पंचायत समिती गणातील शिवसेना शाखेच्या फलकावर जिल्हाप्रमुख गाडे यांचे नाव टाकल्याचा राग औटींना आला, असा खुलासा शेळके यांनी केला. त्यानंतर चास, निंबळक व देहरे गटातील काही गावांतील औटींच्या फलकांना काळे फासले गेले. पारनेर तालुका शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके व पंचायत समितीचे सभापती सुदाम पवार यांच्या शिष्टमंडळाने गाडे यांची भेट घेत हे प्रकार थांबवण्याची विनंती केली. पण औटींची भूमिका काय हे ते सांगू शकले नाहीत. बुधवारी नगर व पारनेर तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी व रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी गाडे यांची भेट घेत औटींच्या कार्यपद्धतीबाबत रोष व्यक्त केला. औटींनी अद्यापही खुलासा केलेला नाही. ते खुलासा करत नाहीत, तोपर्यत माघार नाही, अशी भूमिका नगर शिवसैनिकांनी घेतली आहे.
कर्डिलेंकडेही तक्रारी
राज्यात व नगर पंचायत समितीत भाजप-शिवसेना, रिपाइं अशी महायुती आहे. असे असताना आमदार विजय औटींकडूून भाजपच्या गावागावांतील कार्यकर्त्यांना डावलत जाते. सांगितलेली कामे केली जात नाहीत. त्याच गावातील विरोधकांना पाठबळ दिले जात आहे. औटींच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त करत अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडेही तक्रारी केल्या आहेत.
शुक्रवारी बैठक
नगर व पारनेर तालुक्यातील अनेक गावांतील शिवसैनिकांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी बुधवारी गाडे यांची भेट घेत औटींकडून होत असलेल्या अवहेलनेचा, असहकार्याचा पाढा वाचला. त्यामुळे या भागातील शिवसैनिक व कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी (18 जुलै) दुपारी 1 वाजता हॉटेल यश पॅलेस येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.