आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaya Wad News In Marathi, Writer, Marathi Language, Divya Marathi, Nagar

बाई कितीही हायटेक झाली, तरी घरी गोकुळ नांदते असावे, लेखिका डॉ. विजया वाड यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रत्येक महिलेने संगणक साक्षर होणे ही काळाची गरज बनली आहे. मात्र, बाई कितीही हायटेक झाली, तरी तिच्या घरी गोकुळ नांदते असावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व विश्वकोष मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड यांनी रविवारी केले.जैन सोशल फेडरेशनचा महिला विभाग, लायन्स क्लब व सेवायात्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पध्रेचे पारितोषिक वितरण करताना डॉ. वाड बोलत होत्या. आनंदधाम येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांचे ‘मला हायटेक व्हायचंय. पण घर सांभाळून’ या विषयावर व्याख्यान झाले. जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, आयएमएस संस्थेचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, जैन समाजाचे अध्यक्ष संजय चोपडा, छाया फिरोदिया, आशा फिरोदिया, सविता फिरोदिया, सरोज कटारिया, लायन्सच्या अध्यक्ष मनीषा लोढा, सचिव लता कटारिया, वैशाली कोलते आदी यावेळी उपस्थित होते.


डॉ. वाड म्हणाल्या, आज प्रत्येक घरातील मुले शिक्षण, व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी, परदेशात जात आहेत. मुलांशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क ठेवण्यासाठी महिलांनी संगणक साक्षर होणे आवश्यक आहे. लहान वयात एखादी गोष्ट शिकण्यासाठी आत्मविश्वासाची साथ मिळते. वयाच्या चाळीशी, पन्नाशीत हा आत्मविश्वास बांधावा लागतो.

संगणकाबद्दल भीती बाळगू नका. आत्मविश्वासाने किमान मुलांशी संपर्क ठेवण्यासाठी संगणक शिका. वडीलधार्‍यांचा आदर करून त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. मुलांना आत्मविश्वास द्यायला विसरू नका. कितीही हायटेक झालात, तरी माणुसकी विसरू नका, असा सल्ला त्यांनी दिला.


महाराष्ट्र कन्या विश्वकोष राज स्पध्रेत प्रथम क्रमांक छाया मुथा, द्वितीय क्रमांक सीमा मुनोत, तृतीय क्रमांक पल्लवी शिंगी यांनी पटकावला. पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सरोज कटारिया यांनी केले. अल्पना गांधी यांनी आभार मानले.