आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vikhe And Thorat Failed To Give Separat Candidate In District Director

पूर्ण पॅनल देण्यात विखे व थोरात अपयशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत पारंपरिक प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांना पूर्ण पॅनेल देता आले नाही. विखे गटाच्या पॅनेलला "विमान', तर थाेरात गटाच्या पॅनलला "कपबशी' हे चिन्ह सोमवारी मिळाले. दोन मतदारसंघांत अधिकृत चिन्हांवर थोरात गटाचे उमेदवार नाहीत, तर चार मतदारसंघांत विखे गटाला अधिकृत चिन्हावर उमेदवार देता आले नाहीत. मंगळवारपासून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होत आहे.

शेवटच्या टप्प्यात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी थोरात, विखे व मधुकर पिचड यांच्याकडून झालेले प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर विखे व थोरात या जिल्हा बँकेच्या सत्ताकारणातील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये १५ जागांसाठी लढत अपेक्षित होती. राष्ट्रवादीला सोबत घेत थोरात गटाने पॅनेलची जुळवाजुळव करून रविवारी सायंकाळी अधिकृत पॅनेलही जाहीर केला. मात्र, सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून चिन्हवाटप झाल्यानंतर श्रीरामपूर व श्रीगोंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून थोरात गटाला उमेदवार देता आले नसल्याचे स्पष्ट झाले. श्रीगोंद्यातून प्रेमराज भोईटे व श्रीरामपूरमधून इंद्रभान थोरात हे थोरात गटाच्या पॅनेलचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र, थोरात गटाला मिळालेले "कपबशी' हे चिन्ह या दोन्ही उमेदवारांना मिळालेले नाही. स्थानिक अडचणीमुळे दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांनी स्वतंत्र चिन्ह घेतल्याची माहिती थोरात गटाच्या सूत्रांनी दिली.

दुसरीकडे विखे गटाला चार मतदारसंघांत उमेदवार देता आले नाहीत. नेवासे, कोपरगाव व श्रीगोंदे तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघ, तसेच बिगर शेती संस्था मतदारसंघातून विखे गटाच्या अधिकृत चिन्हांवर उमेदवार नाहीत. बिगरशेती मतदारसंघातून विखे गटाकडून सबाजी गायकवाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, विखे गटाऐवजी स्वतंत्र चिन्ह घेऊन गायकवाड रणधुमाळीत उतरले आहेत.

मतदारसंघनिहाय गट व तेथे लढणारे उमेदवार
अकोले : सीताराम गायकर (थोरात गट,कपबशी), शिवाजी धुमाळ (विखे गट विमान), संगमनेर : रंगनाथ खुळे (विखे गट, विमान), रामदास वाघ (थोरात गट, कपबशी), श्रीरामपूर : जयंत ससाणे (विखे गट, विमान), इंद्रनाथ थोरात (अपक्ष, स्टूल), नेवासे : यशवंतराव गडाख (थोरात गट, कपबशी), भगवान गंगावणे (अपक्ष, छत्री), जामखेड : जगन्नाथ
राळेभात (विखे गट, विमान), रामचंद्र राळेभात (थोरात गट, कपबशी), कर्जत : विक्रम देशमुख (थोरात गट, कपबशी), अंबादास पिसाळ (विखे गट, विमान), श्रीगोंदे : बाबासाहेब भोस (अपक्ष, किटली), दत्तात्रेय पानसरे (अपक्ष, प्रेशरकुक्कर), प्रेमराज भोइटे (अपक्ष छत्री), कोपरगाव : अशोक काळे (थोरात गट, कपबशी), बिपीन कोल्हे (अपक्ष, किटली), शेतीपूरक संस्था : रावसाहेब शेळके
(थोरात गट, कपबशी), दादासाहेब सोनमाळी (विखे गट, विमान), बिगरशेती संस्था : सबाजी गायकवाड (अपक्ष, किटली), अरुण जगताप (थोरात गट, कपबशी), महिला प्रतिनिधी : चैताली काळे (थोरात गट, कपबशी),मिनाक्षी साळंूके (थोरात गट, कपबशी), सुरेखा कोतकर (विखे गट, विमान), प्रियंका शिंदे (विखे गट, विमान), अश्विनी केकाण (अपक्ष, नारळ), अनुसूचित जाती-जमाती : वैभव पिचड (थोरात गट, कपबशी), अशोक भांगरे (विखे गट, विमान), इतर मागासवर्गीय : सुरेश
करपे (विखे गट, विमान), बाबासाहेब भोस (अपक्ष, किटली), अनिल शिरसाठ (थोरात गट, कपबशी), विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग : बाजीराव खंडूजी खेमनर (थोरात गट, कपबशी) बाजीराव गेणूजी
खेमनर (अपक्ष, छत्री), सुभाष गिते (विखे गट, विमान), शिवाजी शेलार (अपक्ष, खुर्ची). प्रचाराला मंगळवारपासून जोर चढेल.

बहुतांश दुरंगी लढती
२१ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध झालेल्या सर्व जागा विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघाच्या आहेत. उर्वरित १५ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून ५ मे रोजी मतदान होणार आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात चौरंगी, इतर मागासवर्गीय मतदारसंघात तिरंगी, तर उर्वरित मतदारसंघात दुरंगी लढती होत आहेत. महिला प्रतिनिधींसाठीच्या दोन जागांसाठी पाच उमेदवार महिला रिंगणात आहेत.

श्रीगोंद्यात त्रांगडे
श्रीगोंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघातून तीन उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील एकानेही थोरात किंवा विखे गटाची उमेदवारी केलेली नाही. त्यामुळे श्रीगोंद्यातील त्रांगडे विखे व थोरात गट कसे सोडवतो, यावरच या जागेचे यश अवलंबून आहे. बाबासाहेब भोस हे या मतदारसंघाबरोबरच इतर मागासवर्गीय मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही ठिकाणी त्यांना किटली हे चिन्ह मिळाले आहे.