आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखेंमुळे काँग्रेसला संजीवनी, राज्याच्या राजकारणात नगरचा दबादबा वाढण्यास मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम यांच्यावर मात करत राधाकृष्ण विखे काँग्रेसचे गटनेते होण्यात यशस्वी झाले. त्यांच्या निवडीने काँग्रेसचे नेतृत्व जिल्ह्याकडे आले असून राज्याबरोबरच जिल्ह्यातही काँग्रेसला त्यांच्याकडून नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

विधानसभेत पक्षाचे गटनेतेपद मिळावे, यासाठी थोरात, विखे व कदम यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. सोमवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांनी गटनेतेपदी विखे यांची निवड केल्याचे जाहीर केले. माजी केंद्रीय मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केलेल्या पत्रकबाजीमुळे राधाकृष्ण यांचा पत्ता कट होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत होती. तसेच विखे पक्षातील काही आमदारांना फोडून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही होती. बाळासाहेब विखे यांनी काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यावा, असे मांडलेले मत या चर्चेला बळ देणारे ठरत होते. मात्र, शेवटी हे दबावतंत्रच कामाला आल्याचे सोमवारी सकाळी स्पष्ट झाले.

आघाडीच्या सत्तेत एकत्र असतानाही विखे यांनी शरद पवार व अजित पवार यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीकडून भाजपच्या सलगीचे प्रयत्न होत आहेत. त्याला शह देण्यासाठीही विखे यांची गटनेतेपदी निवड करण्याची खेळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विखे यांच्या शेजारच्या मतदारसंघातील थोरात यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत पाचारण करून चर्चाही केली होती. त्यामुळे थोरात यांचे नाव गटनेतेपदासाठी निश्चित मानले जात होते. मात्र, सर्व शक्यतांना छेद देत गटनेतेपद मिळवण्यात विखे यशस्वी ठरले. त्यांच्या निवडीने जिल्ह्याला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

नगर जिल्ह्याने भरभरून मते देऊनही भाजपने जिल्ह्यातील एकाही आमदाराला अद्याप मंत्रिपदी संधी दिलेली नाही. केंद्रातील राज्यमंत्रिपद मिळण्याची अपेक्षाही धुळीला मिळाली. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच जिल्हावासियांमधून नाराजी व्यक्त होत असतानाच काँग्रेसने विखे यांची निवड करून जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित केले.
संधीचे सोने करतील
पक्षश्रेष्ठींनी योग्य व्यक्तीची निवड गटनेतेपदी केली. त्याबद्दल समितीच्या वतीने आम्ही पक्षश्रेष्ठींचे आभार मानणारा ठराव करत आहोत. आतापर्यंत ज्या-ज्यावेळी विखे यांना संधी मिळाली, त्या-त्यावेळी त्यांनी संधीचे सोने केले. या संधीचेही ते सोने करतील. त्यांची निवड पक्षाला ताकद देणारी आहे.''
विनायक देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष.