नगर- चितळे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांसाठी नेहरू मार्केटची जागा उपलब्ध करून दिली असतानाही काही भाजी विक्रेत्यांनी चितळे रस्त्यावर पुन्हा ठाण मांडले. मात्र, मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने भाजी विक्रेत्यांचा हा डाव हाणून पाडला. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी स्वत: रस्त्याची पाहणी करत भाजीविक्रेत्यांना समज दिली. पुन्हा चितळे रस्त्यावर बसल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा चारठाणकर यांनी दिला आहे. दरम्यान, नगरसेवक विक्रम राठोड यांनी मात्र चितळे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास विरोध केला.
चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटची रिकामी जागा भाजीविक्रेत्यांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मनसेचे नगरसेवक िकशोर डागवाले, चितळे रस्ता भाजीविक्रेते संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, जिल्हा ग्राहक समितीचे अध्यक्ष उबेद शेख, दीपक सूळ आदींनी प्रशासनाकडे केली होती.
प्रशासनाने तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला. जोपर्यंत नेहरू मार्केटच्या जागेवर व्यापारी संकुल उभारले जात नाही, तोपर्यंत भाजी विक्रेत्यांना नेहरू मार्केटच्या जागेवर बसण्यास स्थायीने मंजुरी दिली. परंतु प्रशासनाने पुढील कार्यवाही केल्याने मनसे भाजी विक्रेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने जागेचे मार्किंग करून ती जागा भाजीविक्रेत्यांना बसण्यास उपलब्ध करून दिली. त्यानंतर दोन दिवस सर्व भाजीविक्रेते नेहरू मार्केटकच्या जागेवर बसले, परंतु काही भाजीविक्रेत्यांनी चितळे रस्त्यावर पुन्हा ठाण मांडले.
जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही भाजीविक्रेते रस्त्यावर बसल्याने मनपाच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्यावर सोमवारी कारवाई केली. परंतु नगरसेवक विक्रम राठोड यांनी या कारवाईस विरोध केला. घासगल्ली, कापडबाजार, मोचीगल्ली येथील अतिक्रमणे का काढत नाहीत, असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला. येत्या तीन दिवसांत शहरातील सर्व अतिक्रमणे काढा; अन्यथा भाजीविक्रेते पुन्हा चितळे रस्त्यावर बसतील, असा इशारा देखील त्यांनी दिला. उपायुक्त चारठाणकर यांनी मात्र राठोड यांच्या विराेधाला जुमानता चितळे रस्त्यावर बसलेल्या सर्व भाजीविक्रेत्यांना पुन्हा नेहरू मार्केटच्या जागेवर बसण्यास भाग पाडले. यापुढे चितळे रस्त्यावर बसल्यास भाजीविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी अतिक्रमण िवरोधी पथकाला दिले आहेत.
आणखी काही दिवस मोकळा श्वास
गेल्याकाही वर्षांपासून भाजीविक्रेते चितळे रस्त्यावर बसत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला होता. परंतु भाजी विक्रेत्यांना नेहरू मार्केटची जागा उपलब्ध झाल्याने हा प्रश्न काही प्रमाणात सुटला अाहे. चितळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. या रस्त्यावर भाजीविक्रेते पुन्हा बसल्यास कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त चारठाणकर यांनी दिला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी हा चितळे रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.
पथदिवे बसवण्याची संजय झिंजे यांची मागणी
भाजीविक्रेतेगेल्या चार दिवसांपासून नेहरू मार्केटच्या जागेवर बसतात. मात्र, अंधार पडल्यावर हे भाजीविक्रेते पुन्हा चितळे रस्त्यावर येऊन बसतात. त्यामुळे या परिसरात तातडीने पथदिवे बसवावेत, अशी मागणी संजय झिंजे यांनी उपायुक्त चारठाणकर यांच्याकडे केली. या भागातील गटारीवर झाकणे नाहीत, गटारीवर तातडीने झाकणे बसवावीत, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन चारठाणकर यांनी दिले.