आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Villagers Stopped Women Out Side Shani Shinganapur

शनिशिंगणापुरात गावकऱ्यांनी महिलांना मंदिराबाहेरच रोखले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर/शिंगणापूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शनीशिंगणापुरात मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करून पाहणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना शेकडो स्थानिक लोकांनी रोखले. कोणत्याही मंदिरात प्रवेश हा महिलांचा मूलभूत हक्क असल्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होेते. याबाबत राज्य सरकारनेही जबाबदारीची जाणीव ठेवून व्यवस्था करावी, असेही उच्च न्यायालयाने बजावले होते. मात्र, या आदेशाला जुमानता स्थानिक लोकांनी महिलांना चौथऱ्यांवर जाण्यास मज्जाव केला.

न्यायालयाचा आदेश असूनही शनीमंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केल्याबद्दल तृप्ती देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करून महिलांसाठी मंदिर प्रवेशाची व्यवस्था केली नाही तर भूमाता ब्रिगेड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करेल असे सांगून यानंतरच्या काळात आपला लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला. ज्या लोकांनी मंदिर प्रवेश नाकारला त्यांच्याविरुद्धही तक्रार दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. महिलांना मंदिर प्रवेशाचा हक्क देण्यासंबंधी दाखल एका जनहितार्थ याचिकेवर सुनावणी करताना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने हा महिलांचा मूलभूत हक्क असल्याचे म्हटले होते. या हक्काचे रक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही न्यायालयाने नमूद केले होते.

तृप्तींसह समर्थकांचे धरणे : चौथऱ्यावर जाण्यापासून गावकऱ्यांनी मज्जाव केल्यानंतर तृप्ती देसाईंसह त्यांच्या समर्थक महिलांनी तेथेच धरणे आंदोलन सुरू केले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.

सर्वोच्च न्यायालयात अाव्हान देणार : दरम्यान,शिंगणापुरात ४०० वर्षांपासून असलेली परंपरा जपली जावी म्हणून स्थापन करण्यात आलेली कार्यसमिती उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा विचार करत आहे. समितीचे सदस्य संभाजी दहातोंडे यांनी सांगितले, ‘भाविकांच्या श्रद्धा जपण्यासाठी लवकरच आम्ही उच्च न्यायालयाच्या निकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ.’