नगर- जिल्हा न्यायाधीशपदी विनय जोशी शनिवारी रुजू झाले. शहर वकील संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. न्यायालयाच्या नवीन इमारतीत वकिलांसाठी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन न्यायाधीश जोशी यांनी दिले.
शहर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. मुकुंद पाटील, सचिव अॅड. अभिषेक भगत यांच्यासह संघाचे पदाधिकारी व वकिलांनी न्यायाधीश जोशी यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, वकील व न्यायव्यवस्था या नाण्याच्या दोन बाजू आहेत. नगर जिल्ह्यातील कामाचा मला अनुभव असून जिल्ह्याची माहिती आहे. न्यायालयाच्या नवीन इमारतीत वकिलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. न्यायाधीश जोशी यांनी नगरमध्ये यापूर्वी साडेतीन वर्षे काम केले असून बुलढाणा येथे सत्र न्यायाधीश म्हणून ते कार्यरत होते. या कार्यक्रमास प्रभारी जिल्हा न्यायाधीश ए. झेड ख्वाजा, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, अॅड. सुरेश लगड, उदय वारंजेकर, डी. एस. खांडरे, आतिश निंबाळकर, अनिल ढगे, विजय भगत, चैतन्य आठरे, अशोक कोठारी, अनिता दिघे, माजी अध्यक्ष शिवाजी कराळे आदी उपस्थित होते.