आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद मोरे याचा खून अनैतिक संबंधातूनच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - विनोद मोरे याच्या खूनप्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. मोरे याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

मोरे याच्या खूनप्रकरणी संजय तुकाराम गुळवे (33), अण्णासाहेब ऊर्फ अनिल दत्तात्रेय तरटे (29, संगमनेर) व अनिल नामदेव गुळवे (21, संगमनेर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून त्यांना अकोले न्यायालयाने 12 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तालुक्यातील सावरचोळ घाटात 30 मे रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत इंडिका कार आढळली होती. या कारमध्ये बिअरच्या बाटल्या सापडल्या होत्या. या बाटल्यांना मोठय़ा प्रमाणात रक्त लागले होते. परिसरातही रक्ताचे डाग आढळून आल्याने पोलिस चक्रावले होते. यासंदर्भात तालुका पोलिस तपास करीत असतानाच शहर पोलिस ठाण्यात विनोद मोरे नावाचा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली. तपासाअंती मोरे हाच ही कार घेऊन सावरचोळच्या घाटात गेल्याची माहिती पुढे आली.

याचा उलगडा पोलिस करीत असतानाच विनोदचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह कळस खुर्द (ता. अकोले) येथे प्रवरा नदीपात्रात आढळून आला. त्याच्या अंगावर असलेल्या जखमांमुळे त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने यासंदर्भात अकोले पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या खून प्रकरणाचे गूढ उकलण्याचे काम अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता ठाकरे, पोलिस निरीक्षक उत्तमराव शेळके व अकोले पोलिसांनी केले. मृत मोरे आणि आरोपी हे मित्र असून ते सर्वजण एकाच ठिकाणी रहात होते.

विनोदच्या अनैतिक संबंधाची चाहूल संजय गुळवे याला लागल्याने त्याने 28 मे रोजी विनोदचा पाठलाग केला. त्याने विनोदला गाठत त्याच्या मानेला चाकू लावत अण्णासाहेब तरटे आणि अनिल गुळवे यांना बोलावून घेत त्याला कळस खुर्द येथे प्रवरा नदीपात्रात नेले. त्याला बेदम मारहाण करीत त्याचा तेथे खून करण्यात आला. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. पोलिस याबाबत आणखी तपास करीत आहेत.