आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tawade Criticize On Maharashtra Government

विधिमंडळाचे पावित्र्य सत्ताधार्‍यांकडूनच भंग- विनोद तावडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- चारा घोटाळ्याबाबत विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर सरकारने आठ दिवसांच्या आत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, दहा महिने उलटत आले, तरी चौकशी अहवालावर कारवाई केली नाही. आता औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने घोटाळेबाजांवर गुन्हे दाखल होणार आहेत. सरकारच्या दुटप्पीपणाची अशी अनेक उदाहरणे आहेत. यातून सत्ताधार्‍यांकडून बहुमताच्या जोरावर विधिमंडळाचे पावित्र्य भंग होत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी केला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते. खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. बिहारमधील चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात जावे लागल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यातील चारा घोटाळ्याबाबत आवाज उठवला. यावर तक्रारी आल्यास चौकशी करू, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेताना तावडे म्हणाले, विधिमंडळाच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात पुराव्यानिशी चारा घोटाळ्याचा प्रश्‍न मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे व्यक्तिश: लेखी तक्रारी केल्या आहेत. त्याची पोचही आहे. दुष्काळग्रस्तांचा निधी लाटणे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे लोणी खाण्यात काँग्रेस व राष्ट्रवादीतील मंत्री, नेते व कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. अधिवेशनात प्रश्‍न मांडताना, लेखी तक्रारी दिल्यानंतर मुख्यमंत्री झोपले होते का? असा सवालही तावडे यांनी उपस्थित केला.

विधिमंडळात विरोधकांनी आवाज उठवलेल्या हिरानंदानी, सानंदा, सुभाष घई भूखंड आदी प्रकरणात सरकारने वेगळी भूमिका घेतली. न्यायालयाने सरकार विरोधात निकाल दिले. विरोधकांचे ऐकायचे व मान्य करायचे नाही अशी सरकार भूमिका घेत आहे. त्यामुळेच विरोधकांना लढा द्यावा लागत आहे, तो यशस्वीही होत आहे. मात्र, यातून विधिमंडळाच्या पावित्र्याला धक्का बसत आहे.

कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील चारा डेपोत झालेल्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी होऊन दहा महिने होत आले तरी कारवाई झाली नाही. भ्रष्टाचारी, घोटाळेबाजांना पाठिशी घालण्याचे पाप मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. नगर, सातारा, सांगली व सोलापूरमध्ये जवळपास पाचशे कोटी रुपयांचा चारा घोटाळा झाला आहे. हे घोटाळेबाज काँग्रेस व राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षातील असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले. मुख्यमंत्री या घोटाळेबाजांना संरक्षण देत असल्याचा आरोप तावडे यांनी केला. राज्यातील चार ते पाच मंत्री यात गुंतले असून या ‘लालूं’ची नावे मुख्यमंत्र्यांना जाहीर करावीच लागतील, असे आव्हानही त्यांनी दिले. बारडगाव दगडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊन मोहरे पकडले गेल्यास त्यांच्या चौकशीतून घोटाळ्याला संरक्षण देणारे मोठे मासे उघडे पडतील, असेही तावडे म्हणाले.

खोट्या जाहिरातबाजीतून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. जमीन अधिग्रहण कायद्यात सरकारी दराच्या (रेडीरेकनर) चौपट किंमत बाधित शेतकर्‍यांना मिळणार आहे. सध्या बाजारभाव सरकारी भावाच्या चौपटच आहेत. पीडित मुली व महिलांना आर्थिक मदतीचा कायदा करण्यात आला. मात्र, केंद्राच्या निधीचे कारण पुढे करुन अद्याप कोणालाही मदत दिलेली नाही. केंद्राच्या नव्याने येणार्‍या जमीन सुधारणा कायद्याला भाजपचा विरोध असल्याचेही तावडे म्हणाले.