आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinod Tawade News In Marathi, BJP, Dilip Gandhi, Pratap Dhakane

भारतीय जनता पक्षातील बंडाळीवर तोडगा काढण्‍यासाठी विनोद तावडे येणार नगरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असताना भारतीय जनता पक्षातील वाद अजून शमायला तयार नाहीत. बंडाळीवर तोडगा काढण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे शुक्रवारी (14 मार्च) नगरला येत आहेत. त्यांच्या शिष्टाईला कितपत यश येईल, याबाबत साशंकता असून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या प्रताप ढाकणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


प्रचारासाठी अवघा महिनाभराचा कालावधी उरला असताना भाजपचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांची नाराजांची समजूत काढण्यातच दमछाक होत आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करत जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणीतील काही पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्याने पक्षापुढेही पेच निर्माण झाला आहे. हा पेच निर्माण होण्यापूर्वी तावडे नगरला येणार होते. 3 मार्चच्या या दौर्‍यात तोडगा निघेल अशी शक्यता होती. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाला आणि बंड उफाळून आले. विश्वासात न घेता गांधी यांची उमेदवारी जाहीर झाल्याने प्रदेश समितीतील पदाधिकारीही नाराज आहेत. ही नाराजी ढाकणे यांच्यामार्फत समोर आली. उमेदवार बदलण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. मात्र, खासदार गांधी यांनी दिल्लीतील वजन वापरून उमेदवार बदलाच्या शक्यतेला खो घातला. सध्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. याची परिणती म्हणूनच ढाकणे यांनी राजीनामा देत गांधी यांचे काम करणार नाही असा पवित्रा घेतला आहे.


ऐन निवडणुकीच्या धामधुमीत निर्माण झालेला हा पेच सोडवण्याची जबाबदारी आता तावडे यांच्यावर आली आहे. त्यासाठी गुरुवारी रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळी ते नगरला येत आहेत. ‘दिव्य मराठी’शी बोलताना तावडे यांनी नगर दौर्‍याला दुजोरा दिला. पक्षाचे पदाधिकारी व ढाकणे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
ढाकणे-गांधी वादाला मागच्या विधानसभा निवडणुकीचीही किनार आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून गांधी हे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचे कारण या वादामागे आहे. ढाकणे यांना विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द देऊन वाद शमवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्याला ढाकणेंकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे भाजप पदाधिकार्‍यांबरोबरच मतदारांचे लक्ष लागले आहे.


ऑफर असूनही सध्या तटस्थ
पक्षहिताच्या दृष्टिकोनातून मी राजीनामा दिला. काही पक्षांकडून उमेदवारीच्या ऑफर येत आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा व सर्व शक्यतांवर विचारमंथन केल्यानंतरच निर्णय जाहीर करेन. सध्या मी तटस्थ आहे.’’ अँड. प्रताप ढाकणे, माजी जिल्हाध्यक्ष.

खासदार गांधी ‘शिवालया’त
शिवसेनेचे आमदार अनिल राठोड व गांधी यांच्यातील मतभेद महापालिका निवडणुकीत उफाळून आले होते. मात्र, वाढदिवसाचे निमित्त साधून गांधींनी राठोडांना शुभेच्छा देण्यासाठी शिवालय हे सेनेचे कार्यालय बुधवारी गाठले.

राष्ट्रवादीचे मेळावे सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारासाठी नेत्यांच्या उपस्थितीत मेळाव्यांना गुरुवारपासून सुरूवात झाली. पक्षांतर्गत नाराजांची मनधरणी करण्यात राजळे यांचाही वेळ खर्च झाला. अंतर्गत धुसफूस अजूनही सुरूच आहे. मात्र, ही धुसफूस शमवण्याचा प्रयत्न करत राजळे यांच्या प्रचारासाठीचे नेत्यांचे मेळावे सुरू झाले आहेत.

मनसेच्या उमेदवारीची शक्यता मावळली
भाजपच्या विरोधात उमेदवार न देण्याची भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे नगरमध्ये मनसे उमेदवार देण्याची शक्यता मावळली आहे. महापालिकेच्या सत्तेत मनसेचे नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूने आहेत. लोकसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने जायचे याचा निर्णयही नगरसेवक व पदाधिकारी स्थानिक पातळीवर घेण्याची सर्वाधिक शक्यता आहे. ‘आप’चा नगरचा उमेदवारही अजून जाहीर करण्यात आलेला नाही.

चर्चेनंतर बोलू..
शुक्रवारी सकाळी मी नगरला येणार आहे. गारपीटग्रस्तांच्या पाहणीसोबतच पक्षात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाबाबत सर्वांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच प्रतिक्रिया देता येईल.’’ विनोद तावडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.