आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांचे उल्लंघन; पालकांची लूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-विद्यार्थी वाहतुकीच्या एकाही नियमाचे सध्या पालन होत नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघड केले. आता काही रिक्षाचालकांनी फक्त पाचच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या नावाखाली दर एकदम दुप्पट केले आहेत. पालकांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेण्याचा हा प्रकार म्हणजे लूटच आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी विद्यार्थी वाहतुकीसाठी रिक्षांचे दरपत्रकच जारी केले आहे. ते पाहूनच पैसे देण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.
रिक्षाचालकांनी फक्त विद्यार्थीसंख्या कमी केली आहे. त्यांनी विद्यार्थी वाहतुकीचा परवाना किंवा रिक्षात आवश्यक ते बदल (पिवळ्या रंगासह) केलेले नाहीत. विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांची अरेरावी पाहता यांना कायदे किंवा नियमांचा काही धाक उरला आहे, की नाही असा प्रश्न पडतो. दरवर्षी शाळा जूनच्या मध्यावर सुरू होतात, तरीही त्या पूर्ण महिन्याचे पैसे रिक्षाचालक घेतात. एप्रिलच्या मध्यावर परीक्षा झाल्यानंतर शाळांना सुटी लागते. त्या महिन्याचेही पूर्ण पैसे पालकांकडून वसूल केले जातात. तसा आमचा नियम असल्याचे पालकांना ठणकावून सांगितले जाते. हा नियम कोणी केला, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. भाडे महिनाभराचे, मात्र रविवारी किंवा सुटीच्या दिवशी शाळेत काही कार्यक्रम असल्यास रिक्षाचालक विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यास नकार देतात.
शहर बससेवा सुरळीत चालू द्यायची नाही आणि प्रवाशांची लूट करायची हा रिक्षाचालकांचा खाक्या किती दिवस सहन करावा लागणार हा प्रश्न आहे. अडलेले पालक आपल्या मुलाच्या रिक्षात कोंबून प्रवासाच्या हालांबरोबरच लूटही सहन करत आहेत.
परमिट न घेता विद्यार्थी वाहतूक करणार्‍या अँपे व पॅगोरिक्षांवर काही प्रमाणात कारवाई करण्यात येत असली, तरी सर्वाधिक बेकायदा वाहतूक त्यांच्याकडूनच होत आहे. त्यामुळे त्यातून विद्यार्थ्यांची नियमबाह्य व मेंढरांसारखी वाहतूक सुरूच आहे. आता काहींनी पोलिस कारवाईला घाबरून विद्यार्थीसंख्या कमी केली असली, तरी दर दुप्पट केले आहेत. त्यांना कोण चाप लावणार, हा प्रश्न आहे. पुढील दिवस परीक्षांचे असल्याने पालक अगतिक आहेत.
पालकांनी तक्रार करावी
विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षांचे दर ठरवण्यात आले आहेत. रिक्षाचालकांनी परस्पर ठरवलेले दर बेकायदेशीर आहेत. याबाबत पालकांनी तक्रारी केल्यास आम्ही कारवाई करू. रिक्षाचा क्रमांक, मार्ग व घेत असलेल्या भाड्याच्या तपशिलासह पालकांनी आरटीओ कार्यालयात येऊन आपली तक्रार दाखल करावी.’’ विलास कांबळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
नेत्यांचा स्वार्थीपणा
केवळ मतांसाठी रिक्षाचालकांच्या मागे उभे राहणार्‍या स्वार्थी व कूपमंडूक नेत्यांच्या सर्मथनामुळे रिक्षावाल्यांची दादागिरी सुरू आहे. आर्थिक हितसंबंध असणारे वाहतूक पोलिसही याला कारणीभूत आहेत. ’’ शशिकांत चंगेडे, अध्यक्ष, नागरिक कृती मंच.
पालक जागरूक हवे
आपली लूट होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची आहे. पाल्याचा प्रवास कसा सुरक्षित होईल, याकडेही लक्ष ठेवण्याची गरज आहे. पालकांनी जागरूक झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.’’ प्रमोद मोहोळे, सन्माननीय नागरिक प्रतिष्ठान.
लुटीला र्मयादाच नाहीत
आरटीओने ठरवलेल्या दरानुसार सावेडीतील विद्यार्थी शहरातील शाळेत येत असेल, तर त्याला दर महिन्याला 386 रुपये 40 पैसे इतके भाडे हवे. रिक्षात 15 विद्यार्थी कोंबूनही रिक्षाचालक पालकांकडून सहाशे रुपये वसूल करतात. हीच स्थिती केडगावची आहे.
शाळांच्या दुर्लक्षामुळे लूट
विद्यार्थी कोठून येतो, कसा येतो याची सर्व माहिती शाळा व्यवस्थापनाकडे असणे बंधनकारक आहे. लांबून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा आवश्यक आहे. मात्र, शहरातील सर्व मराठी माध्यमातील बड्या शाळांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.