आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरच्या स्थापना दिनी विश्वभारतीतर्फे 'नगर भ्रमण'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहराच्या स्थापनेची मुहूर्तमेढ जिथे रोवली गेली, तो देशातील सर्वोत्कृष्ट भुईकोटांमध्ये गणला जाणारा ऐतिहासिक किल्ला, नगर शहर ज्याने स्थापन केले, त्या अहमद निजामशहाने बांधलेला बागरोजा आणि शहरावर लक्ष ठेवणारा गर्भगिरी डोंगरावरचा चांदबिबीचा महाल आरामबसमधून पाहण्याची संधी नगरकरांना मिळणार आहे. ५२५ व्या "स्थापना दिना'चे औचित्य साधून विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने हा सर्वांसाठी मोफत उपक्रम आयोजित केला आहे.
येत्या गुरूवारी (२८ मे) नगर शहराचा ५२५ वा स्थापना दिन आहे. यानिमित्त शहराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नव्या पिढीला नगरच्या ऐतिहासिक वारशाची माहिती मिळावी, यासाठी विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने "नगर भ्रमण' हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरूवारी सकाळी पावणेआठ वाजता दिल्लीगेट हडको परिसरातील साताळकर हॉस्पिटलमागे असलेल्या बागरोजाजवळ सर्वांनी जमायचे आहे. प्रारंभी शहराचा संस्थापक अहमद निजामशाहच्या कबरीवर फुले वाहून आदरांजली अर्पण करण्यात येईल. शहराच्या इतिहासाचे जतन करणाऱ्या काही मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येईल. इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. अशोक नेवासकर, प्रा. पी. डी. ऋषी, श्रीपाद मिरीकर, ज्येष्ठ चित्रकार वसंत विटणकर, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर आदींचा सन्मान आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती विश्वभारती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. कुरेशी यांनी शुक्रवारी दिली.
बागरोजा तालिकोटच्या लढाईच्या स्मारकाची माहिती भूषण देशमुख यावेळी देतील. नंतर आरामबस भुईकोट किल्ल्याच्या दिशेने रवाना होतील. किल्ल्यातील नेता कक्ष अन्य महाल पाहिल्यानंतर डोंगरावरील चांदबिबी महालाला भेट देण्यात येईल.

महापालिका उदासीन
नगरच्या पंचशतकोत्तर रौप्य महोत्सवाचे निमित साधून पर्यटनविकासासाठी राज्य केंद्र सरकारकडून भरीव निधी मागता आला असता. तसे साधे मागणीपत्रही मनपाने पाठवले नाही. पर्यटनविकासासाठी केलेली तरतूदही कागदावरच आहे. सुटीच्या दिवशी शहर बससेवेची एकही बस परिसरातील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी सोडली जात नाही. अन्य शहरांसारखी बससेवा सुरू केली, तर महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडू शकेल.
बातम्या आणखी आहेत...