नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अवघ्या दीडशे लोकांसह आळंदीत आंदोलन केले व माहितीचा अधिकार मिळवला. पण, चारवेळा उपोषण करूनही जनलोकपाल विधेयक मंजूर होत नाही. म्हणून आता निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली आहे. देशात व राज्यात स्वच्छ प्रशासन हवे असेल, तर जनलोकपाल कायदा आलाच पाहिजे. आता व्यवस्था बदलायची खरी वेळ आली आहे, असे प्रतिपादन अण्णा हजारे यांचे सहकारी विश्वंभर चौधरी यांनी येथे केले.
सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात गुरुवारी सायंकाळी आयोजित चौकसभेत ते बोलत होते. यावेळी स्नेहालय संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुवालाल शिंगवी, संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, अँड. श्याम आसावा, संदीप कुसळकर, दत्तात्रेय पांचाळ, राजेंद्र शुक्रे, अजय वाबळे, सारिका गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अँड. आसावा यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीला डॉ. कुलकर्णी यांनी अण्णांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी व महत्त्व विशद केले. नगरच्या महापालिका निवडणुकीत नागरिकांनी चांगल्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी चौधरी म्हणाले, नागरिकांना चांगली न्याययंत्रणा देणे ही घटनेचे कामच आहे. म्हणून अण्णांनी जनलोकपाल कायद्याचा आग्रह धरला. उपोषण हा वैयक्तिक सत्याग्रह आहे. अण्णांच्या चळवळीची भूमिका स्पष्ट आहे. कोणीही आले तरी त्याला स्वच्छ प्रशासन द्यावेच लागेल. लोकपाल विधेयक हे अण्णांमुळेच येणार आहे. अण्णांच्या उपोषणामुळे सरकार हादरले असून दोन दिवसांत काहीतरी सकारात्मक निर्णय होईल; अन्यथा आगामी निवडणुका सत्ताधारी व विरोधकांनाही जड जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अण्णा हजारे यांचे आंदोलन ‘हायजॅक’ होऊ नये..
अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता विश्वंभर चौधरी म्हणाले, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा घेत त्यांनी राजकीय पक्ष काढला. दिल्लीत विजयी झाले म्हणून त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल. पण पक्ष हे उत्तर नाही. कारण व्यवस्था परिवर्तनानेच खरा बदल होतो. सर्वच पक्षांत भ्रष्टाचारी आहेत. अण्णांचे आंदोलन ‘हायज्ॉक’ करायचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, आपण तो होऊ देता कामा नये. अण्णांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी रक्तदान करून ते रक्त प्रतीकात्मक पद्धतीने सरकारला द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.