आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकस बुद्धीने मतदान करा, अन्यथा तुमचा विनोद होईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विनोद प्रत्येकामध्ये दडलेला असतो याचे सध्याचे राजकारणी हे उदाहरण आहे, अशी टीका करून मतासाठी उमेदवार तुमच्या घरी येईल, पण तुम्ही चौकस बुद्धीने मतदान करा. उमेदवार एकदा निवडून आल्यावर पुढील पाच वर्षे मतदार म्हणून आपलाच विनोद होतो, असे आवाहन सिने, नाट्य अभिनेते व दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शनिवारी केले.
जैन सोशल फेडरेशन आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेत ‘विनोद एक दृष्टिकोन’ या विषयावर शिंदे बोलत होते. या वेळी नरेंद्र फिरोदिया, संतोष गांधी, सरोज कटारिया, संजय गांधी आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, काही दिवसांपूर्वी दिल्लीत आम आदमी पक्षाचे (आप) 49 दिवसांचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी देशाला वेगळा नेता मिळेल असे वाटले होते. पण अरविंद केजरीवाल यांची माझी बॅट, माझाच बॉल, मीच बॉलर आणि पंचही मीच अशी अवस्था होती.
अकरा जणांच्या संघाबरोबर खेळायची त्यांना गरजच भासली नाही. त्यातूनही अनेक विनोद झाले.
राजकारणाचा खेळखंडोबा पाहताना मतदारांनी (प्रेक्षकांनी) आपली विनोदबुद्धी जागृत ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. विनोदाचे अंगविक्षेप, प्रसंगनिष्ठ व शाब्दिक हे प्रकार आहेत. माझ्या घरात आजोबांकडून (शाहीर साबळे) मी विनोद शिकलो. लोकनाट्यासारखा मुक्तनाट्य प्रकार त्यांनीच आणला. विनोद अर्थपूर्ण आणि त्यात विनोदच असावा, तो कमरेखालचा नसावा. आयुष्यातील विनोद हरवत आहे. आपल्या मिश्कीलपणामुळे कोणी दुखावणार नाही याची दक्षता घ्या, असा सल्लाही शिंदे यांनी दिला.