नगर- निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वपक्षीय उमेदवार हात जोडून मतदारांपुढे जात असताना प्रभाग 31 मधील एका अपक्ष उमेदवाराने घरात घुसून मतदाराला मारहाण केली. मतदार पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देत असल्याचे कळताच या उमेदवाराने चालकाकरवी मतदाराविरुद्ध तक्रार देण्याचा पराक्रम केला.
प्रशांत किसनराव ठुबे (कायनेटिक चौक, अरणगाव रस्ता) यांनी अपक्ष उमेदवार रमेश परताणी व दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली आहे. ठुबे यांच्या घराच्या संरक्षक भिंतीला लागून रिक्षा उभी करून अपक्ष उमेदवाराचा भोंग्यावरून प्रचार सुरू होता. बराच वेळ हा प्रकार सुरू असल्याने ठुबे यांनी संबंधित चालकाला रिक्षा पुढे नेण्याची विनंती केली. याचा राग येऊन चालकाने ठुबे यांना शिवीगाळ करत रिक्षावरील फलक फाडून बघून घेण्याची धमकी देत पोबारा केला. या घटनेनंतर ठुबे स्नानासाठी गेले. दरम्यान, अपक्ष उमेदवार परताणी हे दोन सहकार्यांसह ठुबे यांच्या घरी आले. ठुबे यांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर मारहाण करण्यात आली. ठुबे यांनी पोलिसांना फोन करू लागताच संबंधितांनी फोन हिसकावून घेतला. ठुबे कुटुंबीयांची आरडाओरड ऐकून शेजारच्यांनी ठुबे यांच्या घरी धाव घेतली. जमाव पाहून जिवे मारण्याची धमकी देत परताणी व त्यांचे साथीदार निघून गेले.
ठुबे यांनी फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलिस ठाणे गाठले. मात्र, त्यांची फिर्याद घेण्यात आली नाही. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याची खबर मिळताच परताणी यांच्या प्रचार वाहनावरील चालक सचिन छगन काळभोर याने वाहनावरील फलक फाडल्याबद्दल ठुबे यांच्याविरुद्धच तक्रार केली आहे.
चौकशी करून कारवाई करू..
अपक्ष उमेदवाराकडून मारहाण झाल्याची तक्रार आली आहे, तसेच फलक फाडल्याबाबतची तक्रारही मिळाली आहे. या दोन्ही अर्जांची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-बाळकृष्ण हानपुडे, पोलिस निरीक्षक, कोतवाली ठाणे.
अशा उमेदवारांवर कठोर कारवाई हवी
नगरसेवक हे जनतेचे सेवक असतात. मात्र, परताणीसारखे काही उमेदवार निवडून येण्यापूर्वीच मतदारांना घरात घुसून मारहाण करायला लागले, तर ते निवडून आल्यानंतर नागरिकांचे काय कल्याण करणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे अशा उमेदवारांवर पोलिस व निवडणूक आयोगाने वेळीच कठोर कारवाई करून अन्य ठिकाणी हे प्रकार घडू नयेत याची काळजी घ्यावी.
-प्रशांत ठुबे, तक्रारदार.