आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Voter Paper Audit Trail Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न‍िकालानंतर पाहता येतील "व्हीव्हीपॅट' मते, जिल्हाधिकारी कार्यालयात "व्हीव्हीपॅट'चे प्रात्यक्षिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर विधानसभा मतदारसंघात यावेळी प्रथमच "व्हीव्हीपॅट' (व्हेरिफायबल वोटर पेपर ऑडिट ट्रेल) या यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उमेदवार "व्हीव्हीपॅट' द्वारे मिळालेल्या स्लीपची मोजणी करण्याची मागणी करू शकतो. त्याद्वारे त्याला किती मते मिळाली, याविषयी माहिती मिळू शकते, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी (२६ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेत "व्हीव्हीपॅट'चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी कवडे यांच्यासह उपनिवडणूक अधिकारी सुनील माळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (इव्हीएम) केलेले मतदान त्याच उमेदवाराला मिळाले, की दुसऱ्याला याबाबत मध्यंतरी शंका उपस्थित झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील नगरसह औरंगाबाद, अमरावती, नाशिक, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व यवतमाळ येथे व्हीव्हीपॅटचा वापर करणार आहे. यात इव्हीएमला एक प्रिंटर जोडले जाते.
मतदाराने मतदानासाठी बटण दाबल्यानंतर प्रिंटरवर एक स्लीप प्रिंट होऊन येते. त्याद्वारे मतदाराला आपण केलेले मतदान त्याच उमेदवाराला मिळाल्याचे दिसते. मात्र, ही स्लीप मतदाराला मिळणार नाही, फक्त‍ पाहता येईल. निकालानंतर गरज वाटल्यास या स्लीपची मोजणी करण्याची मागणी उमेदवार करू शकतात, असे कवडे यांनी सांगितले.
शहरात दाखवणार प्रात्यक्षिक
"व्हीव्हीपॅट'चे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. उमेदवारांनाही "व्हीव्हीपॅट'चे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. नगर शहरात मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांसाठी प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. मत दुसरीकडे गेल्याची तक्रार नागरिकाने प्रशासनाकडे केली, तर मतदार केंद्र अधिकारी तसे लिहून घेईल. तक्रार खोटी असेल, तर त्या नागरिकाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तक्रारीत तथ्य न आढळल्यास सहा महिने कारावास व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते, असे उपनिवडणूक अधिकारी सुनील माळी यांनी सांगितले.
असा करा "व्हीव्हीपॅट'वापर
प्रत्येक इव्हीएम (मतदान यंत्र) बरोबर "व्हीव्हीपॅट' व बॅलेट युनिट असेल. त्याला एक प्रिंटर जोडलेले असेल. त्याला जोडूनच ड्रॉप बॉक्स असणार आहे. बॅलेट युनिटवर निवडणूक लढवणा-यांच्या यादीप्रमाणे नावे व चिन्ह असतील. मतदाराने मतदान केल्यानंतर ते मत त्याला अपेक्षित असलेल्याच उमेदवाराला मिळाले की नाही, याची खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनमधील काचेच्या खिडकीतून सात सेकंदांत एक प्रिंट येईल. ती प्रिंट मतदाराला पाहता येईल.नंतर ही स्लीप मशीनला लावलेल्या बॉक्समध्ये जमा होईल. अमरिश मोहिया, अभियंता, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.