आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाडिया पार्कमधील 37 गाळ्यांना सील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार वाडिया पार्क क्रीडासंकुलातील ‘बी विंग’मधील 1 ते 24 व ‘ए विंग’मधील 13 अशा 37 गाळ्यांना शनिवारी सील ठोकण्यात आले. प्रांताधिकारी राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. खंडपीठाने दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. उर्वरित गाळेधारकांना साहित्य हलवण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. हे गाळे सोमवारी सील करण्यात येतील.
वाडिया पार्क क्रीडासंकुलात संबंधित विकासकाने बांधलेल्या ‘ए’ व ‘बी’ विंग इमारतींवर महापालिकेने आक्षेप घेत त्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने दोन्ही इमारती बेकायदेशीर ठरवत त्या सहा महिन्यांच्या आत पाडण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्तांना दिले होते. त्यानुसार या कारवाईसाठी प्रांताधिकारी पाटील यांची नेमणूक करण्यात आली. पाटील यांनी दोन्ही इमारतींमधील गाळेधारकांची पडताळणी करून त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. सर्व गाळेधारकांनी 28 जानेवारीपर्यंत गाळ्यातील साहित्य काढून घेण्याचे आदेश नोटिसीद्वारे देण्यात आले होते. त्यानुसार 28 जानेवारीनंतर प्रत्येक्ष गाळे सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
दरम्यान, विकासकाने खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर शुक्रवारी (31 जानेवारी) सुनावणी झाली. खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती देण्याची विकासकाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे पाटील यांनी शनिवारी बी विंगमधील 1 ते 24 व ए विंगमधील 13 गाळ्यांना सील ठोकले. उर्वरित गाळेधारकांनी साहित्य काढून घेतले नाही, त्यामुळे त्यांना एक दिवसाची मुदत देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेशास नकार दिल्याने गाळेधारकांनी साहित्य काढून घेतले. अनेक गाळेधारक हतबल झाले आहेत. या गाळ्यांमध्ये सुरू केलेल्या व्यवसायातून त्यांची उपजीविका सुरू होती. परंतु खंडपीठाच्या आदेशामुळे गाळे सोडून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
सर्व गाळे सील करणार
‘ए’ व ‘बी’ विंग या दोन इमारती सील केल्यानंतर सहा आठवड्यांत या निकालाविरुध्द न्यायालयाने आदेश न दिल्यास पुढील तीन महिन्यांत या इमारती पाडून टाकाव्यात, असे खंडपीठाच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशानुसार येत्या मंगळवारपर्यंत (4 फेब्रुवारी) सर्व गाळे सील करण्यात येतील.’’ राजेंद्र पाटील, प्रांताधिकारी.