आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"वाडिया' लेडिज क्लबला मिळेना जागा, जिल्हा प्रशासनाने केले निर्वासित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरच्या वाडिया पार्क लेडिज क्लबची इमारत बळजबरीने पाडल्याच्या घटनेला ११ वर्षे पूर्ण झाली. शहरातील महिलांचा एकमेव क्लब असा लौकिक असलेल्या या क्लबला अद्याप हक्काची जागा मिळालेली नाही. इमारत पाडल्यानंतर तीन जिल्हाधिकारी आले. मात्र, या क्लबला जागेबाबत फक्त आश्वासनेच मिळत आहेत.
नगरच्या वाडिया पार्क लेडिज क्लबची स्थापना सन १९३१ मध्ये झाली. त्या काळात महिला सामाजिक बंधनांच्या जोखडात होत्या. महिलांना नुकतीच शिक्षणाची दारे उघडली जात होती. अर्थात महिलांत शिक्षणाचे प्रमाणही कमी होते. अशा काळात नगरमध्ये महिलांच्या क्लबची स्थापना होणे ही तशी क्रांतिकारी घटना होती. शहरात महिलांच्या खेळांसाठी म्हणून स्वतंत्र व बंदिस्त जागा नव्हती. ही उणीव भरून काढण्यासाठी शहरातील तेहमीनाबाई नगरवाला, यमुनाबाई दुधाट, राधाकाकू चितळे, शांताबाई गोरे, रेणुकाबाई देशपांडे या व इतर उत्साही महिलांनी या क्लबची स्थापना केली. तेहमीनाबाई नगरवाला क्लबच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. वाडिया यांनी या क्लबसाठी जागा दिली. जागा मिळाल्यानंतर वर्षभरातच वर्गणी व देणगी जमवून इमारत बांधण्यात आली. फिरोदिया कुटुंबाने या क्लबला टेबल टेनिसचे टेबल भेट दिले. महिलांबरोबरच मुलांसाठी सीसॉ, जंगलजीम, घसरगुंड्या, असे खेळही उभारण्यात आले. नगर शहराच्या महिलांच्या सांस्कृतिक प्रगतीच्या इतिहासात ठळक नोंद घ्यावी लागेल, अशी ही घटना आहे. आठ आणे भरून या क्लबचे सभासद होता येत असे. त्याकाळी समाज कल्याण खात्याच्या देणगीतून सभासदांसाठी वाचनालय, शिवण क्लास, मुलींसाठी नृत्याचेे वर्ग, भजन क्लास असे उपक्रम होत असत. नंतर वाडिया यांनी संपूर्ण जागा नगर पालिकेला दान दिली. त्यानंतर नगरपालिकेने नाममात्र भाडे घेऊन ९९ वर्षांच्या कराराने क्लबला जागा दिली.

आताही दर महिन्याला होणारे सर्व सण साजरे करणे, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांची व्याख्याने आयोजित करणे, महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे असे उपक्रम सुरूच आहेत. अशा या महिलांच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी झटणाऱ्या क्लबवर २००३ मध्ये गंडांतर आले. त्यावेळी वाडिया पार्कमध्ये क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे, या महिलांना कोणतीही कल्पना न देता व साधी नोटीसही न देता क्लबची वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. त्यातील सामानही महिलांना नेण्यासाठी वेळ देण्यात आला नाही. क्लबला कोणतीही पर्यायी जागा न देता हे घडले. नगरमध्ये अशी बड्यांच्या अतिक्रमणांना हात लावण्याची हिंमत ना महापालिकेत आहे, ना जिल्हा प्रशासनात. मात्र, महिलांच्या क्लबची इमारत अवघ्या तासाभरात जेसीबी लावून तातडीने पाडण्यात आली. शहरात मनपाच्या कितीतरी जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. होत आहेत. मोकळ्या भूखंडांचे श्रीखंड वाटप करण्याचे नियोजनही पूर्ण झाले आहे. मात्र, शांतपणे महिलांच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या ८० वर्षे जुन्या महिला क्लबला जागा मिळत नाही, हा विरोधाभास कायम आहे.
महिला पदाधिका-यांनीही पुसली पाने-
क्लबसाठी पर्यायी जागा म्हणून जकात नाक्याची जागा ठेवण्यात आली होती. ती मनपाकडे आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला तत्कालीन जिल्हािधकारी अन्बलगन यांनी दिला होता. त्यानुसार क्लबच्या सदस्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, त्यांना जागा मिळत नाहीय. विशेष म्हणजे या आधी महिला महापौर व आता उपमहापौर असतानाही क्लबची कैफियत ऐकली गेली नाही.
जागा न देण्यासाठी कोर्टाचे कारण...
त्यानंतर क्रीडा संकुल बांधल्यावर त्यात जागा मिळण्यासाठी क्लबच्या सदस्या जिल्हाधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. सध्या क्रीडा संकुलाचा वाद न्यायालय प्रविष्ट असल्याचे त्यांना सांगितले जात आहे. क्लबला जागा न देण्यासाठी अनेक कारणे सांगण्यात येत आहेत. मात्र, तेथील सर्व व्यावसायिक गाळे मात्र व्यवस्थित सुरू असल्याचे क्लबचे म्हणणे आहे.

क्लब सुरूच ठेवणार
आमची हक्काची जागा गेली. मात्र, आम्ही क्लब बंद पडू दिला नाही. सध्या क्लब महाजन गल्लीतील गायत्री मंदिरातील ज्ञानेश्वर हॉलमध्ये सुरू आहे. तेथेच क्लबचे सर्व उपक्रम सुरू आहेत. आम्ही आमचा क्लब सुरूच ठेवू.'' मंदा सोमणी, खजिनदार, वाडिया पार्क लेडिज क्लब.