आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत इंजिनसाठी जूनपर्यंत प्रतीक्षा, दौंड यार्डातील विद्युतीकरण अपूर्ण कामाचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असणाऱ्या दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर विद्युत इंजिनावरची गाडी धावण्यासाठी जून महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, दौंड स्टेशनच्या यार्डातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे विद्युत इंजिन दौंडपर्यंत जाऊ शकणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. त्यामुळे विद्युत इंजिनच्या रेल्वे वाहतुकीचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडून आतापर्यंत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलेले दावे पोकळ ठरले आहेत.

मनमाड ते दौंंडदरम्यान मार्चअखेरपर्यंत विद्युत इंजिनवरील रेल्वे धावेल, असे रेल्वेचे सूत्र दावा करत होते. मात्र, त्याला दौंड स्टेशनच्या यार्डातील अपूर्ण कामांचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. हे काम जूनपर्यंत पूर्ण होणे शक्य नसल्याने आपोआपच या मार्गावरून विद्युत इंजिनची गाडी धावण्यास विलंब होणार आहे.

मनमाड ते अकोळनेरच्या इंडियन ऑईलच्या डेपोदरम्यान दररोज विद्युत इंजिनवरील मालगाडी धावत आहे. पुढील मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाच्या चाचण्या शनिवारी घेण्यात आल्या. त्यासाठी रेल्वेचे कमिशनर रेल्वेचे सुरक्षा आयुक्त सुशीलचंद्र सोलापूरचे विभागीय व्यवस्थापक अजयकुमार दुबे, चिफ इलेक्ट्रिक डिस्ट्रिब्युशन इंजिनिअर आर. बी. देशमुख, सिनिअर डिव्हिजनल ऑपरेटिंग मॅनेजर नर्मदेश्वर झा, सिनिअर डिव्हिजनल इलेक्ट्रिक इंजिनिअर व्ही. के. सिंग, सिनिअर डिव्हिजनल सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर नवीनकुमार सिंग, सहायक विभागीय कमर्शिअल मॅनेजर भास्कर राव, नगरचे वाणिज्य प्रमुख आर. के. गांधी आदी वरिष्ठ अधिकारी त्यांच्या समवेत होते.

रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंग वधवा यांनी सुशीलचंद्र दुबे यांचा सत्कार केला. यावेळी शहर सहकारी बँकेचे संचालक अशोक कानडे, स्टेशन व्यवस्थापक अरुण पाटील वाणिज्य प्रमुख आर. के. गांधी उपस्थित होते.

या अधिकाऱ्यांचा अहवाल १५ दिवसांमध्ये तयार होईल. त्यामध्ये किरकोळ त्रुटी असल्या, तरी त्या १५ दिवसांत दुरुस्त करणे शक्य आहे. दौंड-मनमाड हा सुमारे १८० िकलोमीटरचा मार्ग एकेरी आहे. त्यात त्यावरून फक्त डिझेल इंजिनच्या गाड्या धावू शकत असल्यामुळे प्रवासाला मोठा वेळ लागतो. त्यामुळे पुण्याहून येणारी रेल्वे अहमदनगरला येण्यासाठी तब्बल साडेतीन तास घेते. त्यात दौंड रेल्वेस्टेशनवर इंजिनची दिशा पूर्ण बदलते. हा द्राविडी प्राणायाम अनेक वर्षांपासून सुरू आहे. प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी या मार्गाचे विद्युतीकरण करावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती.

सध्या मनमाडपासून पुढे पुण्यापासून मुंबईकडील मार्गांचे विद्युतीकरण आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांचे डिझेल इंजिन मनमाड किंवा भुसावळला बदलावे लागते. तेथे विद्युत इंजिन लावण्यात किमान २० मिनिटांचा वेळ वाया जातो.

मुळात मनमाड भुसावळ स्टेशनवर रेल्वेगाड्यांची वर्दळ मोठी असते. त्यामुळे या इंजिन बदलण्याच्या प्रक्रियेमुळे इतर गाड्यांना स्टेशनबाहेर थांबवून ठेवावे लागते. परिणामी त्यांनाही उशीर होतोच. आता विद्युतीकरणामुळे इंजिन बदलावे लागणार नाही. परिणामी, या रेल्वेस्टेशनवर गाड्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही. त्यामुळे विद्युत विद्युत इंजिनावरची गाडी लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

उत्पन्न वाढवण्याच्या सूचना
नगरमध्ये आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना केल्या. उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे त्यांनी सुचवले. अगदी त्यात स्टेशन परिसरात जाहिराती लावण्यासाठी व्यावसायिकांशी संपर्क साधण्याचेही आदेशही स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले. वरिष्ठ अधिकारी येणार असल्याने स्टेशन अगदी चकाचक परिसरात सुगंध दरवळत होता. त्यामुळे प्रवाशांना सुखद धक्का बसला.

दहा वातानुकूलित डबे
नगरमध्ये रेल्वेेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सरंजाम जबरदस्त होता. सुशीलचंद्र ‘निरीक्षण यान’ लिहिलेली दहा वातानुकूलित डब्यांची गाडीच स्वत:च्या बरोबर घेऊन आले होते. डब्यांची रचनाही आतून खोल्यांसारखी होती. त्यात बेड कपाटासह टेबलही होता. ही गाडी एक क्रमांकाच्या फलाटावर पहाटेपासून सकाळी ११ पर्यंत उभी असल्याने सर्व प्रवासी गाड्यांना दोन क्रमांकाच्या फलाटावर थांबा देण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना सामान घेऊन मोठी कसरत करावी लागली.

दुपदरीकरणावर भर आवश्यक
नगरहून सध्या दररोज २० गाड्या जातात. साप्ताहिक गाड्यांची संख्या ४८ आहे. त्यातील २८ गाड्या साप्ताहिक, आठ गाड्या आठवड्यातून दोनदा दहा गाड्या आठवड्यांतून तीनदा जातात. सुटीच्या काळात आठवड्यात १२ गाड्या जातात. त्यांतून आठवड्यातून सुमारे पावणे दोन लाख प्रवासी प्रवास करतात. शिवाय दररोज चार ते सहा मालगाड्याही जातात. हा मार्ग एकेरी असल्याने दोन गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी गाड्यांचा बराच वेळ वाया जातो. ते टाळण्यासाठी दुहेरीकरणावर जोर देणे आवश्यक असल्याचे मत विभागीय व्यवस्थापक अजयकुमार दुबे यांनी व्यक्त केले.
प्रवासाच्या वेळेत कपात...
साडेतीन वर्षांपूर्वी रेल्वेने या कामास मंजुरी देऊन हे काम सुरू झाले. लार्सन अँड टुब्रो कंपनीला विद्युतीकरणाचे काम देण्यात आले. कंपनीने हे काम अतिशय वेगात केले. त्यानंतर १९ नोव्हेंबर २०१५ पासून मनमाड ते सारोळादरम्यान विद्युत इंजिनची मालगाडी सुरू करण्यात आली. आता एकाच विद्युत इंजिनमुळे डिझेल खर्चात बचत तर होईलच, पण गाडीचा वेगही वाढणार आहे. विद्युतीकरणामुळे केवळ नगर ते पुणे या मार्गावरील प्रवासाचा किमान अर्धा संपूर्ण मार्गाचा पाऊणतास वेळ वाचणार आहे.
छायाचित्र: शनिवारी नगरमध्ये रेल्वेचे सुरक्षा आयुक्त सुशीलचंद्र विभागीय व्यवस्थापक अजयकुमार दुबे यांचा सत्कार हरजितसिंग वधवा यांनी केला.