आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदामात धान्य साठवून नफा वाढवण्याची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वखार महामंडळाच्या गोदामांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादित शेतमालावर नफा कमावण्याची संधी आहे. नाममात्र दरात शेतमालाची साठवणूक करून दर वाढल्यानंतर मालाची विक्री शेतकऱ्यांना करता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प उपसंचालक संभाजी गायकवाड यांनी दिली.
जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी सव्वापाच लाख हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, यावर्षी ज्वारीचे पेरणी क्षेत्र १५ टक्क्यांनी घटले. यंदा ३२ ते ३५ लाख क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. केंद्राने ज्वारीसाठी किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल १५५० रुपये जाहीर केली आहे. त्यासाठी ओलाव्याचे प्रमाण १४ टक्के अावश्यक आहे. यातून ४०० कोटी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या ज्वारीला किमान १६०० व कमाल २५०० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. खुल्या बाजारात सरासरी १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

गेल्या वर्षभरातील ज्वारीच्या दराचा आलेख "आत्मा'कडून मांडण्यात आला. गेल्या वर्षी किमान १५५० व कमाल ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दरातील चढ-उतार लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी चाळणी, गाळणी व प्रतवारी करून ज्वारी साठवून ठेवण्याची आवश्यकता आहे. अशा ज्वारीला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अधिक दर मिळू शकतो. दर अधिक असताना साठवणूक केलेली ज्वारी बाजारात विकून अधिकचा नफा शेतकऱ्यांना मिळवता येऊ शकतो.
दर अधिक असताना ज्वारी गोदामातून थेट बाजारपेठेत नेण्याची व्यवस्था असून या पद्धतीचा अवलंब केल्यास एकूण उलाढालीत शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. प्रतिक्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपयांचा नफा शेतकऱ्यांच्या पदरात पडू शकतो. एप्रिल २०१४ मध्ये ज्वारीला किमान १५५० ते कमाल २८००, ऑक्टोबरमध्ये किमान १५०० ते २४०० रुपये दर होता. सध्या १६०० ते २५०० दर मिळत असून बाजारपेठेचा अंदाज घेऊन ज्वारी विकण्यासाठी वखार महामंडळाकडून साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

नफा मिळण्याची हमी
वखार महामंडळाच्या गोदामात धान्याची साठवणूक करून अधिकचा नफा कमावण्याची संधी आहे. नगर, वांबोरी व कोपरगाव येथे महामंडळाची गोदामे आहेत. महामंडळाचे अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळवून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे. स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १४ शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून त्या मार्फतही यात सहभागी होता येईल.'' संभाजी गायकवाड, प्रकल्प उपसंचालक, आत्मा.
सवलत व कर्जाची सुविधा
वखार महामंडळाच्या गोदामात ५० किलोंचा कट्टा साठवण्यासाठी दरमहा ५ रुपये ४५ पैसे भाडे आकारले जाते. यातही शासनाकडून ५० टक्के सवलत देण्यात येते. साठवणूक केलेल्या धान्यावर प्रचलित बाजारमूल्यानुसार ७० टक्के कर्ज बँकांकडून शेतकऱ्यांना मंजूर करण्यात येते. हे कर्जही अवघ्या ७ टक्के व्याजदरात उपलब्ध होते.