आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह : सौर प्रकल्प असूनही रुग्णांना नाही गरम पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरच्या जिल्हा रुग्णालयात सामान्य रुग्णांची कोणालाच चिंता नाही, अशी स्थिती आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना गरम पाणी मिळावे, यासाठी सौर ऊर्जेवरील प्रकल्प उभारण्यात आला. त्यासाठी लाखोंचा खर्चही झाला.मात्र, त्यातून रुग्णांना कधीच गरम पाणी मिळाले नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्हा रुग्णालयात सामान्य कुटुंबांतील रुग्ण येतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. सध्या जी सेवा मिळते, ती रामभरोसे असल्याची स्थिती आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना स्नान किंवा स्पंजिंग करण्यासाठी गरम पाणी मिळावे यासाठी सन २०१२ मध्ये सौर ऊर्जेवरील प्रकल्प उभारण्यात आला. त्यासाठी रुग्णालयाच्या छतावर पॅनेल व मोठी टाकी बसवण्यात आली. त्यासाठी सात लाख दहा हजारांचा खर्च करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकल्पातून रुग्णांना एकदाही गरम पाणी मिळाले नाही, अशी माहिती काही परिचारिकांनी व कर्मचाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

सात लाख ही छोटी रक्कम नाही. हा प्रकल्प बसवणाऱ्या कंपनीला सर्व बिलही अदा करण्यात आले आहे. मात्र, रुग्णांना त्याचा काहीही लाभ झालेला नाही. आता सर्व पॅनेलवर धुळीचा मोठा थर साचला आहे.

ठेकेदाराने प्रकल्पाचे पॅनेल व इतर सर्व यंत्रणा बसवल्यावर टाकीतून गरम पाणी येत असल्याचे दाखवले होते, अशी आठवणही काही कर्मचारी सांगतात. पुढे काय झाले याबद्दल मात्र कोणीच बोलत नाही. एकदा प्रकल्पाची टाकीही खाली पडली. ती नंतर पुन्हा बसवण्यात आल्याचीही माहिती समजली.

सरकारकडून मिळतो म्हणून पैसा कसाही खर्च करायचा. ज्यासाठी पैसा खर्च केला, ती सेवा सतत मिळते की नाही, याचा कोणीही जमाखर्च मांडायला तयार नाही.सन २०१२ मध्ये सौर ऊर्जेवरील प्रकल्प बसवण्यात आला. त्यावेळचे व आताचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना हा प्रकल्प का सुरू झाला नाही, याचे कोणतेही सोयरसुतक असल्याचे जाणवले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. हा प्रकल्प बसवण्यात आला, तेव्हा सध्याचे जिल्हा शल्य चिकित्सक असलेले डॉ. एस. एम. सोनवणे निवासी वैद्यकीय अधिकारी होते. ते मूळचे नगर जिल्ह्यातीलच आहेत. त्यांना या प्रकल्पाच्या स्थितीबाबत सर्व माहिती आहे. ते गेल्यावर्षी जूनमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून येथे रुजू झाले. त्यानंतरही हा प्रकल्प सुरू होण्यासाठी काहीही हालचाल झालेली नाही.
पाइपलाइनच्या वादाने अडवले पाणी!

प्रकल्पाच्या टाकीपासून वॉर्डपर्यंत जलवाहिनी कोणी टाकावी, या वादातून या प्रकल्पाचे पाणी रुग्णांना मिळत नसल्याची माहिती समजली. हा खर्च ठेकेदाराने करायचा की सार्वजनिक बांधकाम विभागाने, वादात या प्रकल्पाची वाट लागली.
ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार निविदेत पुढच्या पाईपलाईनचा खर्च समाविष्ट नाही. तो रुग्णालयाने करायचा आहे. त्यामुळे त्याने पाईपलाईन केली नाही. त्यावेळी रुग्णालयाचे म्हणणे मात्र ही पाईपलाईन ठेकेदारानेच करायला हवी, असे होते. पाईपलाईन टाकण्याचा खर्च काही हजारांत येणार होता. तरी केवळ संबंधितांच्या अडेेल भुमिकेमुळे सरकारचा खर्च वाया गेला आहे. रुग्णांची फरपट करणाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे.
रुग्णांना गरम पाणी मिळते
^एक ते दीड वर्षापूर्वी जिल्हा रुग्णालयात सौर ऊर्जेचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रुग्णांना गरम पाणी मिळत आहे. लेबर रुममध्ये प्रकल्पाचे पाणी येते. येथून ते रुग्णांना उपलब्ध केले जाते. प्रकल्प सुरू असल्याबाबत वेळोवेळी आढावा घेतला जातो. सध्या तो व्यवस्थितपणे कार्यरत आहे.संजय राठोड, कार्यालयीन अधीक्षक, जिल्हा रुग्णालय.
प्रशासनाचा पोकळ दावा
सौर ऊर्जा प्रकल्पासाठीचे साहित्य धूळखात पडलेले असताना प्रशासन प्रकल्प सुरू असल्याचा दावा करत आहे. चाचणीच्या वेळीही प्रकल्प सुरू झालेला नसताना वेळ मारून नेण्यासाठी हा दावा करण्यात येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक एस. एम. सोनवणेंशी याबाबत संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांना एसएमएस पाठवूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यातून प्रशासनाला रुग्णसेवेशी असणारे गांभीर्य लक्षात येते.
नामवंत कंपन्या ठेवल्या दूर!

जिल्हा रुग्णालयात ज्या कंपनीचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवला तिचे नाव महालक्ष्मी सोलर पॉवर सिस्टिम असे आहे. ‘दिव्य मराठी’ने नगरमध्ये चौकशी केली असता, या कंपनीचे कार्यालयाच नसल्याची माहिती समजली. मुळात या कंपनीबद्दल विचारले, तर ते कोणालाही माहिती नव्हते. चांगल्या नामवंत कंपन्यांकडून हा प्रकल्प का बसवला नाही, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ज्या कंपनीचा सरकारशी दर करार झालेला असतो, तिच्याकडूनच हे काम करून घ्यावे लागण्याचे बंधन असल्याचे सांगण्यात आले. नामवंत कंपन्यांशी दर करार का होत नाही, यामागे पुन्हा ‘टक्केवारी’च असल्याची माहिती समजली.
फोटो - जिल्हा रुग्णालयाच्या छतावरील सौर ऊर्जेवरील प्रकल्पाच्या पॅनलची झालेली दुरवस्था. पाण्यासाठी टाक्या ठेवण्यात आल्या असल्या, तरी त्या रिकाम्याच आहेत. छाया : उदय जोशी.