आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉचमनच निघाला चोरट्यांचा टोळीप्रमुख! आरोपींकडून घरफोड्या केल्याची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरफोडीच्या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोलिस पथक. - Divya Marathi
घरफोडीच्या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोलिस पथक.
नगर : ज्याच्या भरवशावर लोक बिनबोभाट घराची, इमारतीची, कार्यालय, बांधकाम साईट्सच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवतात, असा एक वॉचमनच घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा टोळीप्रमुख निघाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडलेल्या चोरट्यांच्या टोळीमुळे हा प्रकार उजेडात आला आहे. सावेडीत एका इमारतीच्या बांधकामावर वॉचमन म्हणून काम करताना त्याने शेजारच्या इमारतींमध्ये रेकी केली. अन् मुलांसह साथीदारांच्या टोळीने लागोपाठ दोन ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लांबवला. 
 
पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की घरफोड्या करणारे काही संशयित आरोपी सावेडी परिसरात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने सावेडीतील गुलमोहोर रोड परिसरात सापळा रचला. गुलमोहोर रोडवर दोन संशयित व्यक्ती बजाज पल्सर मोटारसायकलवर फिरत असल्याचे पोलिसांनी पाहिले. त्यांना हटकले असता त्यांनी वेगाने धूम ठोकली. 
 
पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले चौकशी केली. त्यांनी त्यांची नावे मनोज गोरख मांजरे (वय १९) काळू बाबुलाल जाधव (१९, दोघेही निर्मलनगर, पाइपलाइन रोड) अशी सांगितली. अधिक विचारपूस केली असता त्यांच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मोटारसायकल आपल्या छोट्या भावाने त्याच्या मित्रासह चोरल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच गुलमोहोर रोड परिसरात एका घरामध्ये आठवडाभरापूर्वी घरफोडी केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. 
 
पोलिसांनी दोघांसह त्याच्या छोट्या भावाचा शोध सुरू केला. त्यांच्या घरी गेले असता पोलिसांना मनोजचे वडील गोरख मारुती मांजरे (वय ४४, निर्मलनगर) भेटले. तर छोटा भाऊ मात्र पोलिसांना पाहून पळून गेला. पोलिसांनी गोरख मांजरे यांची चौकशी केली असता ते कोहिनूर मंगल कार्यालयामागे एका बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. एक आठवड्यापूर्वी याच परिसरात दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. चौकशीअंती गोरख मांजरेनेच मुलांसह हे गुन्हे केल्याची कबुली दिली. 
 
पोलिसांनी मनोज मांजरे, काळू जाधव गोरख मांजरे यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांच्या हवाली केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, मन्सूर सय्यद, उमेश खेडकर, पोलिस नाईक विशाल अमृते, दत्ता हिंगडे, संदीप पवार, रावसाहेब हुसळे, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, प्रमोद जाधव, संदीप घोडके, कॉन्स्टेबल योगेश सातपुते, चालक सचिन कोळेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपींची अधिक चौकशी आता तोफखाना पोलिस करीत आहेत. 
 
पूर्वकाळजी घ्यावी 
घराची सर्व कुलूपं दणकट असल्याची खात्री करावी. जास्त काळ बाहेर जायचे असल्यास शेजाऱ्यांना, पोलिसांना माहिती द्यावी. बाहेरगावी जाणार असल्यास तेथील संपर्काचा क्रमांकही द्यावा. दागिने अगर इतर मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात. रात्री घरातील एखादा तरी दिवा सुरू राहिल, अशी व्यवस्था केलेली असावी. पूर्वकाळजी घेणे आवश्यक आहे.'' रंजनकुमारशर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक 
 
 
ग्रामीण मध्येही घरफोड्यांचे प्रकार 
नगर शहरातील कोतवाली तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. गुन्हे शाखेने पकडलेल्या टोळीकडून दोन गुन्हे उघडकीस आले. मात्र, इतर गुन्ह्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. या शिवाय नगर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही चोरट्यांनी घरफोड्यांचे प्रकार सुरुच ठेवले आहेत. या गुन्ह्यांचा तपास लावण्याचे, चोरीला गेलेल्या मौल्यवान मुद्देमाल जप्त करण्याचे आव्हान जिल्हा पोलिस दलासमोर कायम आहे. 
 
सर्व आरोपी सराईत 
पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी सराईत घरफोड्या करणारे आहेत. मनोज मांजरे याच्यावर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दोन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. त्याचा छोटा भाऊ मोटारसायकल चोऱ्या करतो. तो फरार असला तरी सापडल्यास त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांची कबुली मिळू शकते. वॉचमनचे काम करणारा गोरख मांजरे यानेही घरफोड्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. गुन्हे शाखेच्या एकाच कारवाईत चार ते पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. 
 
‘वॉच’ ठेवून कार्यक्रम 
वॉचमनचे काम करणारा गोरख मांजरे काही महिन्यांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातून कुटुंबासह नगरमध्ये स्थलांतरीत झाला. येथे आल्यानंतर त्याने सावेडी परिसरात काम शाेधले. त्याचे राहणीमान पाहून एका बांधकाम साईटवर त्याला वॉचमनचे काम मिळाले. तर त्याची पत्नी याच परिसरात धुणी-भांड्याची कामे करते. गोरखने मात्र वॉचमनची ड्युटी करताना आजूबाजूच्या काही इमारतींमध्ये रेकी केली. अन् मुलांसह साथीदारासह टोळी तयार करुन लागोपाठ दोन घरफोड्या करुन लाखोंचा ऐवज लांबवला. 
 
पण लक्षात कोण घेतो? 
- कार्यालये, इमारती, सोसायट्या, बंगले, कॉलनीत सुरक्षारक्षक किंवा नोकर नेमताना त्यांची सर्व पूर्वचौकशी करावी, खात्री पटल्यानंतरच कामावर ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून नेहमी केले जाते. पण, तसे झाल्यानेच अलीकडे घरफोड्यांचे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या सूचना आवाहन लक्षात घेतले, तर असे प्रकार टळू शकतात.'' दिलीप पवार, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा. 
बातम्या आणखी आहेत...