आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water And Electricty Shortage Issue At Nagar, Divya Marathi

पाणीपुरवठय़ासह शहरातील बत्ती गुल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सलग दोन दिवस वादळीवार्‍यासह झालेल्या पावसामुळे शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाला आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने महावितरणचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. खंडित वीजपुरवठय़ामुळे पंपिंग स्टेशनवरून पाणी उपसा करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
शुक्रवारी (2 मे) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहरात वादळी पावसाने हजेरी लावली. वार्‍याबरोबरच पावसाचा वेग वाढल्याने शहरातील गुलमोहोर, सिव्हिल, मुकुंदनगर, फकीरवाडा या परिसरात तारा तुटल्याने सायंकाळी साडेसहापासूनच वीजपुरवठा खंडित झाला. पाइपलाइन रोड, सावेडी, कल्याण रोड, वसंत टेकडी, मुकुंदनगर या भागातील सुमारे वीस वीज वाहिन्यांवरील तारा तुटल्या, तसेच पारनेर तालुक्यातही काही भागात वादळी पाऊस झाल्याने तेथे विजेचे खांब वाकले. या वादळाचा मोठा फटका भाळवणी परिसराला बसला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी तातडीने भाळवणी, तसेच नगर शहरात कर्मचार्‍यांची पथके दुरुस्तीसाठी रवाना केली. शुक्रवारी रात्री मालेगाव केंद्रावरून, तर बोल्हेगाव व नालेगाव फीडरवरून गुलमोहोर फीडरवर वीज घेऊन सुरळीत वीजपुरवठा करण्यात आला. शनिवारी दिवसभर कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर काम केले. दुपारी आलेल्या पावसामुळे या कामात व्यत्यय आला. तसेच भाळवणी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी आल्या. दुरुस्तीचे काम सुरू असताना शनिवारी पुन्हा पारनेर, भाळवणी व मुळानगर परिसरात विजेचे खांब कोसळले. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठय़ावर झाला आहे. गुरुवारी (1 मे) पाणी योजनेवरील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. शुक्रवारी व शनिवारी पुन्हा वादळी वार्‍यामुळे मुळानगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुळानगर व विळद पंपिंग स्टेशनवरील पाणी उपसा बंद झाला आहे. महावितरणने दुरुस्तीचे काम हाती घेतले असले, तरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत.
वीजपुरवठा खंडित झाल्याने रविवारी (4 मे) मध्यवर्ती भागासह उपनगरात दैनंदिन पाणी वाटपाच्या वेळेपेक्षा उशिराने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मागील महिनाभरापासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत आहे, त्यात आता खंडित झालेल्या वीजपुरवठय़ाची भर पडल्याने मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे.