आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर सोमवारी तीव्र आंदोलन करू; पाण्यासाठी बेलापूर ग्रामस्थांचा निर्णय,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - बेलापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासन व पाटबंधारे विभागाचा या वेळी निषेध करण्यात आला. तीन दिवसांत प्रश्न मार्गी लागला नाही, तर सोमवारी (30 जून) तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी तहसीलदार किशोर कदम व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली.
भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनातून श्रीरामपूरच्या तलावात चाळीस टक्के, तर बेलापूरच्या साठवण तलावात केवळ दहा टक्केच पाणीसाठा झाला असतानाच आवर्तन बंद करण्यात आले. त्यामुळे बेलापूर गावाला सहा ते सात दिवस पाणी पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे.

या विषयावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. नगरपालिकेच्या तलावात पाणी शिल्लक असताना त्यांना पाणी कसे दिले, यावर काही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

यापुढे गावात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. बैठक सुरू असतानाच तहसीलदार कदम, गटविकास अधिकारी परीक्षित यादव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांनी बेलापूरला भेट देऊन माहिती घेतली. ससाणे यांनी पाटबंधारे विभागाच्या गैरव्यवस्थापनामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगितले. यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करण्याचे, तसेच गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
तहसीलदार किशोर कदम यांचे वाहन अडवले
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी गावापासून वीस किलोमीटर अंतरावरील विहिरी व विंधन विहिरींचा वीजपुरवठा बंद करू, असे तहसीलदार किशोर कदम यांनी म्हटल्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतापले. भंडारदर्‍याच्या आवर्तनातून पाणी उचलले जाऊ नये, यासाठी वीज खंडित करण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. प्रशासनाचा नाकर्तेपणा आमच्या माथी का मारता, असा सवाल करून त्यांनी तहसीलदारांना घेराव घातला. तहसीलदारांचे वाहन अडवले. नंतर असे न करता टॅँकर सुरू करू, असे तहसीलदारांनी सांगितल्याने तणाव निवळला.
(फोटो - विंधन विहिरी बंद करण्यावरून तहसीलदार किशोर कदम व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली.)