आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदऱ्यात पाण्याची आवक सुरू, धरणातील पाणीसाठा ५११ दशलक्ष घनफुटांवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - जिल्ह्याच्या उत्तर विभागाची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. घाटघर जलाशय भरल्याने वीजनिर्मितीसाठी पातळी स्थिर ठेवून बुधवारी अतिरिक्त पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हे पाणी भंडारदरा धरणात जमा होत असल्याने पाणीसाठा ५११ दशलक्ष घनफूट झाला.

जून संपत आला, तरी पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. रविवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सलग नसला, तरी अधूनमधून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा आता ५११ दशलक्ष घनफूट झाला आहे. भंडारदरा परिसरात जरी पाऊस कमी असला, तरी घाटघर परिसरात मात्र पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे घाटघर उदंचन प्रकल्प भरला आहे. या पाण्याची आवक सुरू झाल्याने भंडारदरा धरणाची पातळी वेगाने वाढण्यास मदत होईल. घाटघर, पांजरे, उडदावणे या भागात पावसाचे प्रमाण चांगले आहे. त्या तुलनेत भंडारदरा ते बारी भागात मात्र भीजपाऊस होत आहे. अकोले, समशेरपूर या भागात मात्र अद्याप पाऊस सुरू झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या भागात अद्याप भाताची रोपे तयार करण्यात आलेली नाहीत. निळवंडे धरणाची स्थिती अजून बिकट आहे. या धरणात २९९, तर आढळा धरणात १४३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

बुधवारी सकाळी नोंदवलेला पाऊस पुढीलप्रमाणे (आकडे मिलिमीटरमध्ये, कंसात आतापर्यंतचा पाऊस) : भंडारदरा : (७५), घाटघर : २५ (२८६), पांजरे : (१३८) , रतनवाडी : ११ (१५२), वाकी : (८२), निळवंडे (७), आढळा (५), अकोले (५२), कोतूळ (३९).

आंबित जलाशय भरले
मुळाधरणाच्या पाणलोट क्षेत्रातही बऱ्यापैकी पाऊस सुरू असल्याने १९२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबित जलाशय पूर्ण भरला आहे. त्याच्या ओव्हर फ्लोचे पाणी मुळा नदीत झेपावले आहे. अजून या भागातील इतर बंधारे भरल्यानंतरच मुळा नदी कोतूळजवळ वाहती होईल. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

कमी पाणी असतानाही उधळपट्टी
गेल्यावर्षीया दिवसापर्यंत पाणीसाठा २८७६ दशलक्ष घनफूट होता. धरणाने सध्या तळ गाठला आहे. त्यामुळे अनेक पाणीयोजनांच्या पंपाचे फूटव्हॉल्व्ह उघडे पडले आहेत. परिसरात लोकांना टँकर घेण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत या धरणातून अगदी जून महिन्यातही विनाकारण पाणी सोडून त्याची उधळपट्टी करण्यात आली. त्यामुळे भंडारदरा परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...