आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water : Crores Of Ruppes Spend But 100 Villages Thirsty In Ahmednagar

पाणी रे पाणी : नगर जिल्ह्यात कोट्यवधी खर्च करूनही 100 गावे तहानलेलीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यातील 17 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर आतापर्यंत सुमारे 244 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, अधिकार्‍यांची उदासीनता व राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे 10 योजना बंद असून 100 गावे व 160 वाड्यांवरील जनता तहानलेलीच आहे.

नगर जिल्ह्याला वेळोवेळी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. नागरिकांची भटकंती थांबून त्यांना पाणी मिळावे या उद्देशाने प्रादेशिक पाणी योजनांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. पाणी योजना चालवण्यासाठी नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. नागरिक उन्हाळ्यात पाणीपट्टी भरण्यास तयार होतात, पण पावसाळ्यात स्थानिक उद्भवावर पाणी उपलब्ध असल्याने पट्टी भरण्यात येत नाही. त्यामुळे वीजबिल थकून योजना बंद पडते. योजना बंद पडल्यानंतर उन्हाळ्यात लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे योजना सुरू करण्यासाठी व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. अनेक वर्षांपासून पाणी योजनांची ही अडथळ्यांची शर्यत सुरू आहे.

जिल्ह्यात एकूण 17 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. बुर्‍हाणनगर (45 गावे 34 वाड्या), कोल्हार भगवतीपूर (2 गावे 16 वाड्या), मिरी-तिसगाव (24 गावे), निमगाव गांगर्डा (18 गावे 19 वाड्या), चांदा (5 गावे) या योजना सध्या सुरू आहेत. उर्वरित योजना तांत्रिक अडचणींमुळे बंद आहेत. तांत्रिक अडचणी जनतेने निर्माण केलेल्या नाहीत. नियोजनशून्य कारभाराचा तो परिणाम आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.

पाणी योजना, त्यावरील खर्च व सध्याची स्थिती : आडगाव पाणी योजना (9 कोटी 14 लाख) 60 टक्के काम अपूर्ण. पूरक पिंप्री निर्मळ (3 कोटी 13 लाख) 20 टक्के काम अपूर्ण. कमालपूर घुमनदेव (2 कोटी 30 लाख) चाचणी झाली, पण बंद, रांजणगाव देवी (2 कोटी 3 लाख) न्यायप्रविष्ट असल्यामुळे बंद, हातगावसह 28 गावे (13 कोटी 50 लाख) अपूर्ण. याबाबत ‘दिव्य मराठी टीम’ने अधिकार्‍यांची भेट घेतली, पण सर्वांनीच वरिष्ठांकडे बोट दाखवत तांत्रिक अडचणी पुढे केल्या. कोट्यवधी खर्च केल्यानंतर पाणी मिळेल अशी आशा असणार्‍या सामान्य नागरिकांना तांत्रिक अडचणींशी देणे-घेणे नाही. पैसा खर्च केला, तर पाणी कुठंय असा सवाल जनता करत आहे.


पूर्ण झालेल्या योजनाही बंद
जीवन प्राधिकरणने सुमारे 150 कोटी खर्च करून 10 प्रादेशिक पाणी योजनांचे काम पूर्ण केले. पैकी डोंगरवाडी, वैजुबाभूळगाव, कान्हूरपठार, निमगाव गांगर्डा, आखोणी या पाच योजना आजही बंद आहेत. योजना सुरू होणार नसतील, तर कोट्यवधींचा खर्च कशासाठी हा प्रश्न निरूत्तरीत आहे.


बिल न भरल्याने योजना बंद
कार्यान्वित झाल्यानंतर वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन योजना बंद पडते. सरकारने बिलातील 67 टक्के वाटा उचलला असला, तरी नागरिकांकडून उर्वरित पैसे भरले जात नाहीत. सरकारने 100 टक्के वीजबिलाचा खर्च उचलल्यास योजना अखंडितपणे सुरू राहतील.’’ जी. बी. सागू, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण.


राज्यकर्तेच जबाबदार
राज्यकर्त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला पाणी मिळत नाही. प्रभावी अंमबजावणी न करता बैठका घेऊन केवळ दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. टँकरवर केलेला खर्च जर प्रादेशिक योजनांवर केला असता, तर परिस्थिती आटोक्यात राहिली असती.’’ राम शिंदे, आमदार.