आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन पावसाळ्यात पाणीकपात सुरूच !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - समाधानकारक पाऊस पडत असल्याने मुळा धरण 72 टक्के भरले आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील पाणीकपात बंद करून पूर्ववत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिका प्रशासन मात्र याबाबत निर्णय घेण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

शहराला ऐन पाणीटंचाईच्या काळात मुळा धरणातून दररोज सुमारे 65 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, मे महिन्यात धरणातील पाणीपातळी खालावल्याने महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. नंतर जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडून मुळा धरण 72 टक्के भरले, तरी पाणीकपात बंद झालेली नाही. सध्या 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात सध्या 18 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पूर्ण क्षमतेने पाणीउपसा करणे मनपाला शक्य आहे. असे असतानाही प्रशासन शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेण्यास तयार नाही.

पाणीकपातीच्या निर्णयाची 7 मेपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मध्यवर्ती शहरासह उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. एकीकडे धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर दुसरीकडे नगरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याने तेथील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसर, निर्मलनगर, र्शमिकनगर आदी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने थेट नळालाच इलेक्ट्रिक मोटार जोडून पाणी भरावे लागते. सिव्हिल हडको परिसरातही गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू आहे. वेळेत व पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांना नाईलास्तव हातपंपांचा आधार घ्यावा लागत आहे.

मध्यवर्ती शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात येत होता, परंतु पाणीकपातीच्या निर्णयामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी भल्या पहाटे पाणी सोडण्यात येत असल्याने महिलांना पाणी भरण्यासाठी कसरत करावी लागते.

केडगाव, सारसनगर, तसेच मुकुंदनगर भागातील पाणीप्रश्न अजूनही ‘जैसे थे’ आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईला नागरिकांनी आतापर्यंत तोंड दिले. मनपाने घेतलेल्या पाणीकपातीच्या निर्णयालाही नगरकरांनी सहमती दर्शवली.