आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या दिवशीही पाऊस, नदी, नाले, ओढे पुन्हा भरून वाहू लागले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. रब्बी हंगामातील पिकांना या पावसाने तारले आहे. दुपारी तीनपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने नगर शहरातील बहुतेक रस्ते जलमय झाले होते.

जूनच्या प्रारंभी जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली होती. जूनमध्ये तेरा दिवस सलग पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. जुलै ऑगस्ट कोरडे गेले. त्यामुळे खरिपातील सर्व पिके जळून गेली. खरीप वाया गेल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर होती.

तब्बल अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर सप्टेंबरपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. तब्बल पंधरा दिवस पावसाचा जोर कायम होता. परतीच्या पावसामुळे रब्बीच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे रब्बी हंगामात तब्बल लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. त्यात सर्वाधिक लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीच्या पेरण्या झाल्या. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाअभावी रब्बी हंगामातील ज्वारीची पिके सुकू लागली होती.

रविवारपासून (२२ नोव्हेंबर) पावसाला पुन्हा सुरुवात झाली. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. गेल्या २४ तासांत ९.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक २२ मिलिमीटर पावसाची नोंद पारनेर तालुक्यात झाली आहे. संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, नगर, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदे, पाथर्डी जामखेड या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.
सोमवारी दुपारी तीनपासून नगर शहरात पावसाला सुरुवात झाल्याने लालटाकी, झेंडीगेट, माळीवाडा, सावेडी, भिंगार, कापडबाजार, प्रोफेसर कॉलनी, नागापूर, केडगाव या भागातील रस्ते जलमय झाले होते. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारीचे शंभर टक्के उत्पादन निघणार आहे. त्याचबरोबर मका, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांनाही या पावसाने दिलासा दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात गव्हाच्या हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, या पावसामुळे गव्हाच्या पेरण्यांना आणखी वेग येणार आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी खरिपाचा कांदा काढून शेतात ठेवला होता. अचानक झालेल्या पावसामुळे हा कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा उडाली.

गेल्या महिन्यात जिल्ह्यात ६४ टँकर सुरु होते. नोव्हेंबरपासून टँकरला मागणी वाढली. सध्या ९१ टँकर सुरु आहेत. या पावसामुळे पाणी टंचाईचा प्रश्न तात्पुरता मिटणार असला, तरी येत्या दोन महिन्यांत पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या पावसाने चारापिकांनाही चांगला दिलासा दिला. दोन महिने पुरेल इतका चारा या पावसामुळे उपलब्ध होणार आहे.

एकूण पाऊस (मिलिमीटरमध्ये)
{अकोले१९
{कोपरगाव ०५
{संगमनेर १२
{राहाता ०५
{श्रीरामपूर ०२
{राहुरी ८.४
{नेवासे ०२
{नगर १४
{शेवगाव ०१
{पारनेर २२
{कर्जत १०
{श्रीगोंदे २०
{जामखेड १३.२

मुळा धरणाच्या कालव्यांचा विसर्ग वाढला
सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या मुळा धरणाच्या पाण्याचा वेग सोमवारी सायंकाळी वाढवण्यात आला. पावसामुळे लाभक्षेत्राच्या शेवटपर्यंत पाणी पोहचण्यास मदत मिळणार आहे. रब्बी सिंचनासाठीचे आवर्तन २२ ला दुपारी सोडण्यात आले. सुरुवातीला कमी असलेला विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला. सोमवारी सायंकाळी वाजता उजव्या कालव्याचा विसर्ग १२००, तर डाव्या कालव्याचा विसर्ग ३०० क्युसेसपर्यंत वाढवण्यात आला. लाभक्षेत्रातही काही ठिकाणी पाऊस झाला असला, तरी आवर्तन सुरूच राहणार आहे.