आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगावला जूनमध्ये मिळणार योजनेचे पाणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले केडगाव पाणीपुरवठा योजनेचे (फेज 1) काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. येत्या पंधरा दिवसात उर्वरीत काम पूर्ण करून जूनच्या पहिल्या आठवड्यापासून योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे 70 हजार केडगावकरांचा मागील दहा-बारा वर्षांपासून सुरू असलेला पिण्याच्या पाण्याचा वनवास कायमचा संपणार आहे.

महापालिकेने केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी अंतर्गत हाती घेतलेल्या केडगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामात आतापर्यंत अनेक विघ्ने आली. निधीची कमतरता, ठेकेदार संस्थेची कामांतील टाळाटाळ, सत्ताधारी व विरोधकांमधील राजकारण, तर कधी प्रशासनाची उदासीनता, अशा अनेक कारणांमुळे योजनेचे काम रखडले होते. मात्र, युतीच्या सत्ताधार्‍यांनी शहर तसेच उपनगरांच्या पाणीप्रश्नाला प्राधान्य दिल्याने केडगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळाली. महापौर शीला शिंदे यांनी वेळोवेळरी पाठपुरावा करून योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालिन आयुक्त संजय काकडे यांच्या कार्यकाळात योजनेचे काम अनेकदा बंद पडले, परंतु विद्यमान आयुक्त विजय कुलकर्णी यांनी पद्भार स्वीकारल्यापासून केडगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामातील अडचणी दूर केल्या. त्यामुळे महापौर व आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे ही योजना आता पूर्णत्त्वाकडे आहे.

या योजनेंतर्गत नागापूर पंप हाऊस ते एकनाथनगर येथील मुख्य पाण्याच्या टाकीपर्यंत साडेबारा किलोमीटर मोठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यातून एकनाथनगरसह ओंकारनगर व जपेनगर येथील तीन टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. तसेच केडगावमध्ये 78 किलोमीटरच्या अंतर्गत जलवाहिन्या व नऊ किलोमीटर गुरूत्त्ववाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे 30 किलोमीटर अंतरावरील अंतर्गत जलवाहिन्यांची हायड्रोलिक टेस्टिंगही पूर्ण झाली आहे. उर्वरित टेस्टिंगचे काम प्रगतीपथावर आहे. पाण्याच्या टाक्या ते अंतर्गत जलवाहिन्यांना जोडण्यासाठी अपूर्ण असलेले रोडक्रॉसिंगचे काम दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. योजनेच्या कामात मुख्य अडसर ठरणार्‍या एकनाथनगर, ओंकारनगर, जपेनगर, मोहिनीनगर व लोंढे मळा येथील पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी तीन टाक्यांत पाणी सोडण्यात आले आहे. उर्वरित दोन टाक्यांत पाणी सोडण्यासाठी रोडक्रॉसिंगचे काम सुरू आहे. ते झाल्यावर पाणी सुरू होणार आहे.

पाठपुराव्यामुळे योजना पूर्ण
रखडलेली केडगाव पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासन व ठेकेदाराच्या वेळोवेळी बैठका घेतल्या, स्थानिक नगरसेवक दिलीप सातपुते व शिवाजी लोंढे यांच्या सहकार्याने कामात येणार्‍या अडचणी सोडवण्याठी सर्व प्रयत्न केले. महापौर पदाचा पदभार घेतल्यापासून शहराच्या पाणीप्रश्नाला प्राधान्य दिले. त्यामुळेच केडगावची पाणी योजना आता पूर्ण होत आहे.’’ शीला शिंदे, महापौर

टक्केवारीसाठी पाइप खरेदी
काँग्रेसच्या काळात योजना मंजूर झाली, परंतु तेव्हाच्या सत्ताधार्‍यांनी टक्केवारीसाठी सर्वात अगोदर पाइप खरेदी केली. पाइप खरेदीऐवजी अगोदर पिण्याच्या टाक्या बांधल्या असत्या, तर योजनेचे काम रखडले नसते. त्यांच्यामुळे रखडलेली ही योजना आमदार राठोड व महापौरांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण होत आहे. निवडणुकांच्या वेळी आम्ही मुबलक पाणी देण्याचे वचन दिले होते, ते आम्ही पाळले. ’’ दिलीप सातपुते, नगरसेवक, केडगाव

गणपती विसर्जन करणार
काँग्रेसच्या सत्ताधार्‍यांनी तीन वर्षांपूर्वी जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करून योजनेचे काम पूर्ण नसतानाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचे जलपूजन केले होते. त्यामुळे आम्ही रास्ता रोको आंदोलन करून जोपर्यंत केडगावला पाणी मिळणार नाही, तोपर्यंत गणपती विसर्जन न करण्याचा इशारा दिला होता. आता महिनाभरात योजना कार्यान्वित झाल्यानंतर आम्ही वाजत गाजत गणपती विसर्जन करणार आहोत.’’ शिवाजी लोंढे, नगरसेवक, केडगाव