आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पिंपळगाव खांड’मधून ‘मुळा’कडे नवीन पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर/भंडारदरा - जून महिना उलटला तरी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्राला हुलकावणी देणाऱ्या वरुणराजाने शनिवारपासून (२ जुलै) धाे-धो बरसण्यास सुरुवात केली. मुळा धरणाच्या वरील आंबित पिंपळगाव खांड धरण ओलांडून सह्याद्रीच्या रांगांमधील नवीन पाणी रविवारी सायंकाळी मुळा धरणाकडे झेपावले. पाच क्युसेक वेगाने निघालेले हे पाणी रात्री किंवा सोमवारी सकाळपर्यंत मुळा धरणात पाेहोचेल.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपासून धो-धो पावसाला सुरुवात झाली. या धरणाने कधी नव्हे, ते यंदा निचांकी पाणीसाठ्याचा विक्रम नोंदवला होता. मात्र आता पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. धरणाच्या पश्चिम भागातील घाटघर, रतनवाडी, सांम्रद, शिंगनवाडी येथे २४ तासात तब्बल साडेपाच इंच (१२६ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली. परिणामी भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वेगाने होत आहे. या पावसाने १२ तासांत भंडारदऱ्यात तब्बल ५४६ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. ११ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात रविवारी सकाळपर्यंत ८२६ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले होते. धरणातून सध्या ९४१ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी निळवंडे धरणात जाणार आहे. रविवारी सकाळपासूनच्या बारा तासांत सहा ते सात इंच पावसाची नोंद झाली. यातून भंडारदरा धरणात रविवारी सांयकाळी १३३१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. साडेसहा टीएमसी क्षमतेच्या निळवंडे धरणातही सध्या ३३४ दलघफू पाणी जमा झाले आहे. पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे धरणाच्या पश्चिमेकडे असलेले धबधबे डोंगररांगांच्या कड्यावरून कोसळत आहेत.

शहर औद्याेगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासोबतच चार ते पाच तालुक्यातील बहुतांश शेतीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या मुळा धरणात नवीन पाण्याची आवक यंदा लवकर सुरू झाली. मात्र, प्रमुख पाणलोट क्षेत्र असलेल्या कोतूळ परिसरातून या धरणात अद्याप नवीन पाणी आलेले नाही. मात्र, मुळाच्या पाणलोट क्षेत्रातील आंिबत धरण तीन दिवसांपूर्वीच भरले होते. रविवारी सायंकाळी ५५० दशलक्ष घनफूट क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण भरल्यानंतर मुळा धरणाकडे नवीन पाणी झेपावले. तत्पूर्वी राहुरी तालुक्यात झालेल्या पावसातून मुळा धरणात आतापर्यंत १७७ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. मुळा धरणाची एकूण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट आहे. सध्या धरणात हजार ५४६ घनफूट पाणी उपलब्ध आहे. यात मृतसाठा वगळता हजार ४६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी आहे.

रतनवाडीला झोडपले
भंडारदरा परिसरात शनिवारपासून चोवीस तासात पडलेल्या पावसाच्या नोंदीनुसार रतनवाडी परिसराला पावसाने धो-धो झोडपले. या परिसरात ३७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर भंडारदरा परिसरात ५६, घाटघर परिसरात ११६, पांजरे परिसरात ९७ वाकी परिसरात ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पर्यटकांची गर्दी
पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार आगमनासोबतच पर्यटकांची गर्दी वाढली आहे. डोंगरदऱ्यातून खळाळणाऱ्या धबधब्यांखाली मनसोक्त भिजण्याचा अानंद पर्यटक ठिकठिकाणी घेत आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक बाजारपेठेतही उत्साह संचारला असल्याची माहिती येथील व्यावसायिकांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...