राहुरी - मुळा धरणातून जायकवाडी धरणासाठी सध्या ५ हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. धरणाखालील पहिल्याच डिग्रस बंधा-यावरील फळ्या काढण्यास विलंब झाल्याने पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. मुळा व प्रवरेचा संगम असलेल्या तिळेश्वर येथे मंगळवारी दुपारी मुळाचे पाणी पोहोचले. त्यानंतर ते पाचेगावपर्यंत (ता. नेवासे) आले. बुधवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरपर्यंत पाणी पाेहोचेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
मुळाचे कार्यकारी अभियंता आनंद वडार सकाळी डिग्रस बंधा-यावर ठाण मांडून होते. ४१ गाळे असणा-या डिग्रस बंधा-यावर आठपैकी केवळ प्रत्येकी दोन फळ्या काढण्यास विभागाला यश आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार मुळा धरणातून सोमवारी ३ हजार ८० क्युसेकने मुळा नदीत पाणी सोडण्यात येत होते. मंगळवारी ५ हजार क्युसेकने पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे. दुपारी तीनच्या सुमारास प्रवरा नदी व मुळा नदी संगमावरील तिळेश्वर येथे पाणी पोहोचले. मुळा धरणावर १५ पोलिसांचा ताफा आहे.
४५ किमी प्रवास पूर्ण
मुळा ते जायकवाडी बॅकवॉटरचे अंतर ७० कि.मी. आहे. सध्या पाणी रात्री उशिरा पाचेगावपर्यंत पोहोचले. दोन दिवसांत पाण्याने ४५ किमी अंतर कापले. उर्वरित २५ किमी पार करून हे पाणी बुधवारी दुपारी जायकवाडीच्या बॅकवाॅटरपर्यंत पोहोचू शकते.दरम्यान, पाणी सोडल्यामुळे नगरमध्ये एक रोटेशन कमी मिळणार आहे.