आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पेटले: संगमनेरात बंद, तर घोडेगावला रास्ता रोको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जायकवाडीला जाणाऱ्या पाण्याविरोधात संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. दुसऱ्या छायाचित्रात घोडेगाव येथे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. छाया: विवेक भिडे/ किरण दरंदले.
संगमनेर/ नेवासे - भंडारदरा,निळवंडे धरणांतून सोडलेले पाणी संगमनेरहून जायकवाडीकडे झेपावले असताना मंगळवारी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या संगमनेर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. दुपारनंतर बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत सुरू झाले.

नगर, नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडीसाठी १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दोन्ही जिल्ह्यांत याविरोधात संतापाचे वातावरण आहे. याविरोधात आमदार थोरात यांनी पुढाकार घेत सर्वपक्षियांनी येत आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. मंगळवारी संगमनेर बंद पुकारत मोर्चाचे आयोजन केले होते.

थोरात यांच्या आवाहनाला काँग्रेसवगळता अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आमदार थोरात आणि तांबे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आंदोलन करण्यात आले. संगमनेरमध्ये सकाळी बंद पाळण्यात आला. दुपारनंतर सर्व व्यवहार पूर्ववत झाले. पोलिस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस निरीक्षक, सात एपीआय, पीएसआयसह साठहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मोर्चासाठी तैनात होता. शिवाजी पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चाचा समारोप नेहरू गार्डनमध्ये झाला. निवडक पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. दरम्यान, आमदार थोरात यांच्या भाषणावेळी दारू पिऊन गोंधळ घातल्याच्या कारणावरून शहर पोलिसांनी अविनाश भोर याला ताब्यात घेत कारवाई केली.

घोडेगाव चौफुलीवर रास्ता रोको
"मुळा'तूनजायकवाडीला पाणी सोडू नये या मुद्यावर माजी आमदार शंकरराव गडाख यांनी पुन्हा एकदा रास्ता रोको केल्याने त्यांना अटक झाली. यावेळी त्यांच्याबरोबर ३०० शेतकऱ्यांनी अटक करून घेतली. गडाख शेतकरी यांना सायंकाळी सोडून देण्यात आले.

मुळा धरणाच्या शिल्लक पाण्यातून तालुक्यातील सर्व बंधारे भरून द्यावेत, त्वरित एक आवर्तन सोडावे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे. या मागणीसाठी माजी आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली घोडेगाव चौफुलीवर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार दौलतराव पवार, विठ्ठल लंघे, शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, बाबा आरगडे हे आंदोलनात सहभागी होते. गडाख म्हणाले, मराठवाड्यातील नेते जनतेला खुष करण्यासाठी जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. पण ते आले नाहीत. ते आले असते, तर दबाव वाढला असता. त्यांनी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला. मागील आंदोलनाच्या वेळी शासकीय अधिकारी पोलिसांना आमदार मुरकुटे यांनी त्रास देऊन बदली केली. खेवरे म्हणाले, पाणी सोडण्याचे काम भाजपचे आहे. शिवसेना याच्या विरोधात आहे, पाण्यात राजकारण नको म्हणून मी यात सहभागी आहे. यावेळी ३०० शेतकऱ्यांसह गडाख, लंघे, कारभारी जावळे, नानासाहेब तुवर, भाऊसाहेब मोटे, सतीश गायके आदी शेतकऱ्यांना अटक झाली. शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख आंदोलनात सहभागी झाले असले, तरी स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते या आंदोलनात नव्हते.
सर्वांनी एकत्र येत भक्कमपणे लढा
पिण्यासाठीपाणी द्यायला हवे या मताचा मी आहे. औरंगाबादचा पालकमंत्री असताना मृतसाठ्याचे पाणी वापरता येत नसल्याचे सांगितल्याने १९ कोटी रुपये आपण मराठवाड्याला पिण्याच्या पाण्यासाठी दिले. मुख्यमंत्र्यांना काही लोक एकत्रित भेटायला गेले, जिल्हा बँकेत एकत्र आले याचा आनंद वाटला. आता मात्र हे सर्व कोठे गेले. सगळे एकत्र येऊन भक्कमपणे लढा. संगमनेरकर तुमच्यासोबत आहे. मला अडचणीत आणण्यासाठी कोणी अफवा पसरवू नका. माझी बांधिलकी जनतेशी आहे. बाळासाहेब थोरात, आमदार.