आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकट: पाणीपट्टीत 18 टक्के वाढ; आठशे उद्योगांना फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आर्थिक मंदी, दुष्काळ व वीज दरवाढीमुळे शहर व जिल्ह्यातील उद्योगांना घरघर लागली असताना राज्य शासनाने उद्योगांच्या पाणीपट्टीत 18 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील 1200 मोठय़ा व लघू उद्योगांना बसणार आहे. त्यात नगर शहरातील 800 उद्योगांचा समावेश आहे. दरम्यान पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय लागू झाला नसला तरी हा निर्णय झाल्यास उद्योजकांच्या संघटना आक्रमक होणार आहेत.

नगर शहर व जिल्ह्यात 6 हजार 500 उद्योग असल्याची अधिकृत नोंद जिल्हा उद्योग केंद्राकडे आहे. यात खासगी कारखाने, लघू उद्योग, सुक्ष्म उद्योग व सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. नगर शहरातील नागापूर एमआयडीसीला 37 वर्षांपूर्वी राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती. मंजुरीनंतर या औद्योगिक वसाहतीत पहिले दोन मोठे उद्योग (गरवारे व सह्याद्री) आले. त्यानंतर क्रॉम्प्टन, एल अँण्ड टी, सीसी इंजिनिअरिंग व कमिन्स हे उद्योग दाखल झाले. सध्या नागापूर औद्योगिक वसाहतीत 720 मोठे व लघू उद्योग आहेत. सुपे औद्योगिक वसाहतीत 80 छोटे व मोठे उद्योग आहेत.

नागापूर व सुपे या दोन उद्योगांमध्ये सध्या 12 हजारांहून अधिक कामगार आहेत. नागापूर व सुपे औद्योगिक वसाहतीतील मोठय़ा व छोट्या उद्योगांमधून दरवर्षी सुमारे पाच ते सहा हजार कोटींची आर्थिक उलाढाल होते. मात्र, आर्थिक मंदी व दुष्काळ व त्यातच वीजदरात वाढ झाल्यामुळे या उद्योगांमधून मालाची मागणी 40 टक्क्यांनी घटली आहे. मागणी घटल्यामुळे कारखान्यांमधील उत्पादन कमी झाले आहे. मागील वर्षी सुपे व नागापूर औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांमधून सुमारे चार हजार कोटींची उलाढाल झाली होती. यंदा मात्र, केवळ अडीच हजार कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. उत्पादन घटल्याने त्याचा मोठा फटका कारखानदारांबरोबरच कामगारांना बसत आहे. अनेक कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर सध्या कामासाठी युवकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. आर्थिक मंदी, दुष्काळ व वीज दरवाढीमुळे उद्योजक मेटाकुटीस आले असतानाच आता राज्याच्या जलसंपदा विभागाने उद्योगांच्या रॉयल्टीत वाढ केल्याने उद्योगांच्या पाणीपट्टीत वाढ होणार आहे हे निश्चित झाले आहे. राज्यातील उद्योगांच्या पाणीपट्टीत 18 टक्क्यांनी वाढ करणाचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे समजते. नगर शहरातील नागापूर व सुपे औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या पाणीपट्टीत 1 मार्च 2012 पासून वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. उद्योजकांना प्रति घनमीटर पाण्यासाठी 2.50 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. मंदी, दुष्काळ व विजेच्या दरवाढीमुळे उद्योजक अगोदरच संकटात असतानाच राज्य सरकारने उद्योगांच्या पाणीपट्टीत 18 टक्क्यांनी वाढ करण्याबाबत हालचाली सुरू केल्याने उद्योजक आणखी संकटात सापडणार आहेत.

अन्यथा आंदोलन करणार
मंदी, दुष्काळ व वीज दरवाढीमुळे सध्या औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने बंद झालेले आहेत. त्यातच राज्य सरकारने उद्योगांच्या पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय उद्योजकांसाठी अन्यायकारक आहे. निर्णयाचा मोठा फटका उद्योगांना बसून सुरू असेलेले उद्योगही बंद होतील. या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा. या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करू’’ अशोक सोनवणे, अध्यक्ष, आमी संघटना.

मुख्यमंत्र्यांना भेटणार
दुष्काळामुळे अगोदरच उद्योजक अडचणीत आलेले आहेत. त्यातच वाढीव पाणीपट्टीचा अतिरिक्त बोजा उद्योगांवर पडणार आहे. राज्य सरकारने वाढीव पाणीपट्टीबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणे गरजेचे आहे. पाणीपट्टीत वाढ केली, तर सरकारने उद्योजकांना अन्य करांमध्ये सवलती द्याव्यात. पाणीपट्टीत वाढ करू नये यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेऊन त्यांना विनंती करण्यात येणार आहे.’’ प्रकाश गांधी, उद्योजक.

18 रुपयांनी मिळणार पाणी
नागापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना सध्या प्रतिघन मीटर पाण्यासाठी 15.50 रुपये द्यावे लागत आहे. नव्याने वाढ झाल्यानंतर प्रतिघन मीटर पाण्यासाठी 18 रुपये मोजावे लागणार आहेत. ग्रामपंचायत भागात 3 रुपये 75 पैशाने पाणी दिले जाते.