आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये पाणीकपात करण्याची गरज नाही?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे मुळा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणारे पाणी थांबल्याने नगरकरांना, तसेच या धरणावर अवलंबून असलेल्यांना दिलासा मिळाला आहे. जायकवाडीसाठी मुळातून 31 जुलैपर्यंतच्या पिण्याच्या पाण्याच्या नियोजनातून 108 दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी सोडले गेले. मुळाच्या पाणलोट क्षेत्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच नवीन पाण्याची आवक सुरू होते. त्यामुळे या पाण्याची उणीव भरून निघून जुलैपर्यंतचे पाण्याचे नियोजन अबाधित राहू शकते, असे मत पाटबंधारे खात्यातील अधिकार्‍यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना गुरूवारी व्यक्त केले. त्यामुळे पाणीकपातीची गरज नाही असे काहींचे म्हणणे आहे.

जायकवाडीला पाणी सोडण्यापूर्वी मुळा धरणात 2 हजार 14 दशलक्ष घनफूट साठा होता. पैकी गाळ, बाष्पीभवन वगळता 1 हजार 179 दशलक्ष घनफूट पाणी वापरयुक्त होते. 31 जुलैपर्यंत जिल्ह्याला 1 हजार 113 दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आहे. उर्वरित 66 दशलक्ष घनफूट हा राखीव साठा होता. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने जायकवाडीसाठी पुरेसे पाणी सोडण्याचा आदेश दिला. त्यानुसार मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले. जायकवाडीला पाणी दिल्यामुळे नगर शहरात पाणी टंचाई निर्माण होणार असल्याने या निर्णयाविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर झालेल्या सुनावणीत बुधवारी (8 मे) जायकवाडीला पाणी देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. ही प्रक्रिया सुरू असताना मुळा धरणातून जायकवाडीसाठी राखीव 66 दशलक्ष घनफूट पाणीसाठय़ासह सुमारे 174 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. त्यामुळे जुलैअखेर केलेल्या नियोजनातील 108 दशलक्ष घनफूट पाणी कमी होणार आहे.

शहर पाणी योजनेच्या पंपिंग स्टेशनमधील 560 अश्वशक्तीचे 2 व 200 अश्वशक्तीचे 2 पंप नियमित सुरू आहेत. मात्र, धरणातील पाणी पातळी आणखी कमी झाल्यास हे पंप पुरेसा उपसा करू शकणार नाहीत. या परिस्थितीचा विचार करून महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय घेतला. तथापि, मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात नवीन पाण्याची आवक होते, असा 1972 पासूनचा अनुभव आहे. त्यामुळे जायकवाडीसाठी गेलेल्या 108 दशलक्ष घनफूट पाण्याची उणीव भरून निघू शकते.